आला उन्हाळा : कोरेगाव पार्कचा पारा 37 अंशांवर | पुढारी

आला उन्हाळा : कोरेगाव पार्कचा पारा 37 अंशांवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शनिवारपासून शहराच्या कमाल तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाली असून, दिवसा उन्हाचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. शहरातील कोरेगाव पार्क भागाचा पारा सर्वाधिक 37 अंशांवर गेला होता. मागच्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा शहर उशिरा तापण्यास सुरुवात झाली आहे. थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे यंदा उत्तर भारतातील थंडीचा मुक्काम जास्त वाढला. डिसेंबरमध्येही राज्य गारठले नाही. मात्र, उत्तर भारतातून येणार्‍या शीतलहरी आणि बंगालच्या उपसागरतील सततच्या कमी दाबाच्या पट्ट्यांनी शहरात यंदा ऊन, पाऊस अन् ढगाळ वातावरण हिवाळ्यात राहिले. मागील दोन वर्षांच्या तुलनेत फेब्रुवारीत शहराचा पारा उशिरा चढला. मागच्या वर्षी 17 फेब्रुवारी रोजी कोरेगाव पार्कचा पारा 39 ते 40 अंशांवर गेला होता. राज्य तापण्यास येथून सुरुवात झाली. मात्र, यंदा शहराचे कमाल तापमान 34 ते 35 अंशांवरच आहे. तर किमान तापमान अजूनही 13 ते 18 अंशांवर आहे.

कमालकिमान तापमान

  • कोरेगाव पार्क 37 (19.8)
  • शिवाजीनगर 35 (14.5)
  • पाषाण 35(15.8)
  • लोहगाव 36(17.8)
  • चिंचवड 36 (20.7)
  • लवळे 36(22.2)
  • मगरपट्टा 36(21.1)
  • एनडीए 36(13.7)

तापमानात तफावत

शहरात यंदा थंडी कमी पडली. मात्र, पहाटे व रात्रीचे तापमान सतत कमी राहिले. जानेवारीमध्ये या दोन्ही वेळेचे तापमान 10 ते 12 अंशांवर स्थिर राहिले. फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत रात्री व पहाटे किमान 12 ते 14 अंशांवर होते. मात्र, गेल्या 24 तासांत वातावरण बदलले अन् उन्हाचा चटका वाढला.

आर्द्रता घटली

शहरात 15 फेब्रुवारीपर्यंत आर्द्रतेची टक्केवारी 75 ते 80 च्या दरम्यान होती. मात्र, शनिवारपासून ढग गायब झाले. वातावरण शुष्क व कोरडे झाल्याने आर्द्रता घटली. शिवाजीनगर 83, पाषाण 79, लोहगाव 39 टक्के आर्द्रता नोंदवली गेली.

21 फेब्रुवारीपासून पारा घसरला

बंगालच्या उपसागरात पुन्हा प्रतिचक्रवात वारे सुरू झाल्याने त्या भागातून शहरात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात फारसा फरक पडणार नाही. मात्र, किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत सरासरी किमान तापमान 18 ते 22 अंशांवर जाईल. मात्र, 21 पासून ते 13 ते 14 अंशांवर खाली येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

Back to top button