पादचारी मार्गाला अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंगचे ग्रहण; टिळक रस्त्यावरील स्थिती | पुढारी

पादचारी मार्गाला अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंगचे ग्रहण; टिळक रस्त्यावरील स्थिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हातगाडीची अतिक्रमणे… ठिकठिकाणी पादचारी मार्गावर असलेल्या दुकानदारांची अनधिकृतपणे उभी केलेली वाहने… दुकानदाराने गायब केलेला पादचारी मार्ग… पादचारी मार्गावरच धोकादायकरीत्या उभारण्यात आलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर डीपी, अशा दयनीय स्थितीमध्ये पुणेकरांना टिळक रस्त्यावरील पादचारी मार्गाने चालावे लागत आहे, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेला रस्ता म्हणून टिळक रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याला लोकमान्य टिळक असे नाव प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यावरील पादचारी मार्गावरून चालताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची पाहणी दै. ’पुढारी’च्या प्रतिनिधीने नुकतीच केली. त्यावेळी अनेक समस्या पहायला मिळाल्या.

दुकानदारांची अतिक्रमणे रोखा

टिळक रस्त्यावर ठिकठिकाणी दुकानदारांनी अतिक्रमणे केली आहेत. विक्रीच्या साहित्याबरोबरच त्यांची दुचाकी वाहनेदेखील सर्रास पादचारी मार्गावर लावली जात आहेत. यामुळे येथून ये-जा करणार्‍या पादचार्‍यांना कसरत करत चालावे लागत आहे. त्यातच ज्येष्ठ नागरिकांचे तर प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सुस्तावलेल्या अतिक्रमण विभागाने येथे धडक कारवाई करून अतिक्रमणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पादचार्‍यांकडून केली जात आहे.

महावितरणचे डीपी काढा

अतिक्रमणांसोबतच टिळक रस्त्यावर पादचार्‍यांना महावितरणकडून लावण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मर डीपींचादेखील मोठा अडथळा आहे. काही ठिकाणी या डीपींमधून अक्षरश: विद्युततारा बाहेर निघालेल्या आहेत. यामुळे पादचार्‍यांच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे महावितरणने येथील पादचारी मार्गावरील डीपी तातडीने हलवावेत, अशी मागणी पादचार्‍यांकडून केली जात आहे.

अशी आहे रस्त्याची स्थिती

टिळक चौकातून प्रतिनिधीने पायी चालत पाहणी करायला सुरुवात केली. त्यावेळी टिळक चौकातून स्वारगेटच्या दिशेने येणार्‍या रस्त्यावरील डाव्या बाजूचा पादचारी मार्ग मसापपर्यंत (महाराष्ट्र साहित्य परिषद) ठीक होता. मात्र, उजव्या बाजूकडील पादचारी मार्गावर न्यू इंग्लिश स्कूलशेजारी अतिक्रमणे पहायला मिळाली. येथे एक हातगाडीचे, नीराविक्रीचे आणि लोकप्रतिनिधीने केलेल्या वाचनालयाचे पादचारी मार्गावर अतिक्रमण दिसले.

त्यानंतर मसापपासून पुढे स.प. महाविद्यालयापर्यंत डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्गांवर दुकानदारांची अतिक्रमणे आणि वाहनांचे सर्रास केलेले पार्किंग दिसले. टिळक स्मारक मंदिरासमोरील पादचारी मार्गावरच विक्रेत्याने बुटांचे स्टँड लावल्याचे दिसले. तसेच, स.प. महाविद्यालयासमोर एका दुकानदाराने तर चक्क पादचारी मार्गच गायब केला आहे. त्यावर आपले दुकान थाटले आहे. पुरम चौकापासून हिराबागेकडे जाणार्‍या रस्त्यावर डाव्या बाजूला पादचारी मार्ग खोदून ठेवला आहे. याठिकाणी महापालिकेच्या संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी पादचार्‍यांकडून केली जात आहे.

कामानिमित्त मला टिळक रस्त्यावरील पादचारी मार्गाने ये-जा करावी लागते. मात्र, या रस्त्यावरील पादचारी मार्गाने चालताना मला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने या रस्त्यावरील पादचारी मार्ग रिकामे करून आम्हाला सहकार्य करावे.

– रवी मेंगडे, पादचारी

हेही वाचा

Back to top button