नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी
यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने 'आम्हाला शिक्षक देता का शिक्षक' असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्हाला शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. – वैष्णवी कोल्हे, विद्यार्थिनी.

येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिले ते आठवीपर्यंत शालेय वर्ग आहेत. या शाळेत एकूण 322 विद्यार्थी शिकत असून, शाळेला आठ शिक्षकांची गरज असताना, या शाळेत केवळ तीनच शिक्षक उपलब्ध आहेत. यामुळे अजून पाच शिक्षकांची मागणी पालकांकडून केली जात आहे. या संदर्भात शाळा व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडून नांदगाव शिक्षण विभागाकडे वेळोवेळी लेखी तसेच तोंडी मागणी करूनही येथे शिक्षक उपलब्ध होत नसल्याने पालक वर्गाकडून खंत व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षकांची कमतरता असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक पालक आपल्या पाल्यांना शाळेतून काढून घेत खासगी शाळेत दाखल करीत आहेत. यामुळे शाळेत लवकरात लवकर शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी विद्यार्थी-पालक वर्गाकडून केली जात आहे.

दोन वर्षांत वेळोवेळी मागणी केली, पण शिक्षण विभाग नांदगाव हे आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे विद्यार्थी खासगी शाळेत दाखल होत आहेत. याला शिक्षण विभाग जबाबदार आहे. – धर्मनाथ आव्हाड, शिक्षण समिती, उपाध्यक्ष.

संबंधित विद्यार्थी, पालकांची मागणी रास्त आहे. परंतु आपल्या तालुक्यात शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त असल्यामुळे अशा अडचणी येत आहेत. यंदाही मोठ्या प्रमाणात शिक्षक बदलून गेले असून आणि नवीन आलेल्यांची संख्या कमी आहे. आता जुलै महिन्यात शिक्षक देण्याचे आश्वासन मिळाले आहे. जसे शिक्षक उपलब्ध होतील तसे लवकरात लवकर शिक्षक देण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रमोद चिंचोले, प्रभारी गटशिक्षण अधिकारी.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news