मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनपर्यंत जाहीर होईल अशी माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली आहे. (MHT CET Results)
तर जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेशाच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे. हा निकाल http://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर पाहाता येईल.
अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी आणि अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. दोन वर्ष कोरोनामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना मोठा फटका बसला होता. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. विद्यार्थ्यांचे वर्ग १ नोव्हेंबरपासून सुरू झाले. (MHT CET Results)
प्रवेश प्रक्रिया उशिरा होवूनही प्रवेशात वाढ झाली होती. अभियांत्रिकीच्या १ लाख ४५ हजार २०१ जागा होत्या त्यापैकी १ लाख ०९ हजार ४९९ जागांवर प्रवेश झाले होते. सुमारे ३६ हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. गेल्या दहा वर्षातील रिक्त जागांचे प्रमाण हे सर्वात कमी गतवर्षी होते. यंदा परीक्षा मे महिन्यात पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर होणार आहे. परीक्षेचा निकाल १२ जूनपर्यंत जाहीर होईल अशी माहिती आयुक्त महेन्द्र वारभुवन यांनी दिली.. यानंतर या सीईटीच्या गुणांच्या आधारे अभियांत्रिकी व अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल असेही सांगण्यात आले आहे.
हेही वाचा