हिंजवडी : पुढारी वृत्तसेवा : आयटी पार्क हिंजवडी आता समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. हिंजवडी आयटी पार्कच्या प्रमुख रस्त्यांना अतिक्रमणाचे ग्रहण लागले आहे. आयटीतील मुख्य रस्त्याच्या पदपथांवर शेकडो अतिक्रमणे करण्यात आली आहेत. त्यामुळे परिसरात दररोज वाहतूककोंडी होत आहे.
एमआयडीसीने तयार केलेले पदपथ पादचार्यांसाठी आहे की पथारीवाल्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच एमआयडीसी मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतच्या हद्दीतील 50 टक्के करवसुली करत असून तो कर कशासाठी वापरला जातो आणि अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माणच कसे होतात? असा सवाल आता उपस्थित केले जात आहेत.
या अतिक्रमाणावर कारवाई करण्याचे धाडस एमआयडीसी प्रशासन करत नाही. यामुळे पादचारी, आयटीयन्स प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथे नव्याने हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम प्रगतिपथावर असल्याने या कामाकरिता मुख्य रस्त्यांवर बॅरिकेट्स लावण्यात आल्याने मुख्य रस्ता अतिशय अरुंद झाला आहे.
यामुळे वाहतूककोंडी होत आहे. यातच आयटीनगरीचे हिंजवडी (आयटी उद्यान फेज 1) येथील मुख्य रस्त्यावरील पदपथावर दुकाने थाटून बसलेल्या व्यावसायिकांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. त्यामुळे या भागात सकाळ, संध्याकाळ मोठी वाहतूककोंडी होते.
कोरोना संकटानंतर आता काही आयटी कंपन्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्याने हिंजवडीची रहदारी पुन्हा वाढली आहे. मेट्रोमुळे आधीच अरुंद झालेल्या रस्त्यांच्या पदपथावर भाजीवाले, फळविक्रेते, ज्यूस सेंटर व काही खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांनी गर्दी केली आहे.
या पथारीवाल्यांकडे खरेदीसाठी येणार्यांना जावे लागत आहे. ग्राहकांमुळे वाहतूककोंडीत अधिकची भर पडत आहे. व्यावसायिकांकडून पदपथ गिळंकृत झाल्याने पायी ये-जा करणार्या पादचार्यांची मोठी गैरसोय होत आहे.
एमआयडीसी हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी 24 तास ऑनड्युटी कार्यरत असणारे कंत्राटदार नियुक्त केले जातात. अतिक्रमणे हटविण्याचे लाखोंचे टेंडर दिले जाते.
मात्र, या टेंडरची मुदत संपल्याने सद्यःस्थितीत एमआयडीसीकडे अतिक्रमण हटविण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नाही.टेंडर पास झाल्यानंतर तत्काळ अतिक्रमण हटविण्यात येईल, असे कनिष्ठ अभियंता प्रताप शिंदे यांनी सांगितले.
हिंजवडी परिसरातील कोणकोणत्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले याची कनिष्ठ अभियंत्यांकडून माहिती घेतो. परंतु, अनेक ठिकाणी ग्रामपंचायत व पीडब्लूडीच्या ताब्यात बरेचसे रस्ते असल्याने तिथे कारवाई करताना अडचणी येत आहेत.
-पी. बी. रुईकर, कार्यकारी अभियंता