पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने ११ लाख ८० हजारांचे अमलीपदार्थ पकडले | पुढारी

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाने ११ लाख ८० हजारांचे अमलीपदार्थ पकडले

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेल्या एका अमलीपदार्थ तस्कराला दहशतवाद विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ हस्तगत केला आहे. महंमद फारुख महंमद उमर टाक (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी वेस्ट, मुंबई, मुळ रा. राजस्थान) असे अटक केलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे.

याबाबत दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या रोडवरील फुटपाथवर एक जण येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दहशतवाद विरोधी पथकाने तेथे सोमवारी दुपारी सापळा रचून महंमद टाक याला पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ११ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ आढळून आला. तसेच मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य मिळाले. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार अशोक फारुख पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सुभाळकर, सहायक निरीक्षक दत्तात्रय दराडे, पोलीस नाईक गायकवाड, पोलीस हवालदार पेरणेकर,शिंदे, गुंजाळ यांनी ही कारवाई केली. पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर हे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button