नाशिक : दिंडोरीत “जिरेनियमचा” सुगंध; बळीराजाचे अनोखे पीकबदल, पारंपरिक शेतीला दिला फाटा

दिंडोरी : "जिरेनियम"च शेती.
दिंडोरी : "जिरेनियम"च शेती.
Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : समाधान पाटील

निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्षशेती धोक्यात आल्याने शेतकरी आपल्याला आर्थिक आधार कसा मिळेल, यासाठी नवनीवन प्रयोग करीत आहे. तालुक्यात ड्रॅगन फूडची शेती यशस्वी होत असताना आता शेतकऱ्याने आपल्या शेतीत "जिरेनियम"या सुगंधी वनस्पती पिकाची लागवड सुरू केली आहे.

तालुक्यातील अक्राळे शिवारातील राहुल दौलत कदम यांनी आपल्या एक एकरच्या शेतीमध्ये पारंपरिक शेतीला फाटा देत हा प्रयोग यशस्वी केल्याने अनेकांचे लक्ष वेधले आहे. सुगंधी वनस्पती जिरेनियम शेतीचा दिंडोरी तालुक्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकले जाते. तसेच रोपे तयार करून लागवडीसाठी विक्री करण्यात येते. कदम यांनी तीन फूट बाय दीड फूट अंतरावर रोपांची लागवड केली असून, एकरी दहा हजार रोपे लावली आहेत. एका रोपाची किंमत साधारणपणे सहा रुपयांना आहे. जिरेनियमच्या झुडपांची लागवड केल्यापासून तीन ते चार महिन्यांत साधारणतः अडीच ते तीन फूट उंचीपर्यंत वाढ होऊन पाल्याची पहिली कापणी केली जाते. एका एकरात एका कापणीपासून सहा ते सात टनांपर्यंत पाला व त्या पाल्यांपासून सहा किलो सुगंधी तेल मिळू शकते. लागवड केल्यापासून चार वर्षांपर्यंत उत्पन्न घेता येते.

असे मिळते उत्पन्न…
जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून ३० ते ४० किलो सुगंधी तेल मिळते. जिरेनियमच्या तेलाला एका किलोला १२ ते १५ हजार रुपये भाव मिळतो. यासाठी विविध कंपन्यांबाबत विक्री करार करण्यात येतो.

एकरी १० ते १५ किलो सुगंधी तेल उत्पादन…
प्रक्रिया करून जिरेनियम या वनस्पतींच्या पानांपासून तेल काढले जाते. जिरेनियमच्या तेलाला प्रतिकिलो १३ हजार रुपयांपर्यत भाव मिळतो. एकरी १० ते १५ किलो तेलाचे उत्पन्न मिळते. यातून शेतकरीवर्गाला दीड ते दोन लाख रुपयांपर्यत आर्थिक उत्पन्न मिळते.

सुगंधी तेलाचे फायदे असे…
जिरेनियमपासून तेलनिर्मिती केली जाते. तसेच कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खतनिर्मिती केली जाते. या वनस्पतीला भारतातून विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर मागणी असते. परफ्युम व काॅस्मेटिकसाठी याचा वापर केला जातो. फरफ्युममध्ये जो नैसर्गिकपणा लागतो, तो यामधूनच मिळते. त्यामुळे जिरेनियम तेलाचा सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर आदींसाठी उपयोग केला जातो.

जिरेनियम वनस्पतीची एकदा लागवड केल्यास किमान तीन ते चार वर्षे उत्पादन मिळते. एका एकरामध्ये १० हजार रोपे लागतात. हे पीक एका वर्षात तीन ते चार वेळा कापणीला येते. एकरी सुरुवातीला खर्च ७० ते ८० हजार रुपये येतो. इतर पिकांच्या तुलनेत पाणी कमी लागते. रोगांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी, फवारणी व खते यांचा खर्चही अत्यंत कमी आहे. – राहुल दौलत कदम, कोराटे, ता. दिंडोरी जिरेनियम उत्पादक.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news