अपघाताला महानगरपालिकाच जबाबदार, मुलाचा खड्ड्यामुळे गेला होता जीव; कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश | पुढारी

अपघाताला महानगरपालिकाच जबाबदार, मुलाचा खड्ड्यामुळे गेला होता जीव; कुटुंबियांना नुकसान भरपाई देण्याचे न्यायालयाचे आदेश

पुणे: राज्यात खड्यांमुळं होणाऱ्या अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहनं चालवावी लागत आहेत. १६ वर्षांपूर्वी पुण्याच्या रस्त्यातील खड्ड्याने तरुणाचा जीव घेतला. त्यावेळी पालकाने न्यायालयात दाद मागितली. आपला एकुलता एक मुलगा गमावलेल्या दिनेश सोनी यांनी तब्बल 16 वर्ष न्यायालयीन लढा देत ही लढाई जिंकली आहे. सध्या याची चर्चा सर्व माध्यमांमध्ये होताना दिसत आहे.

शहरातील खड्ड्यामुळे दुचाकी घसरून अपघाती मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 16 टक्के वार्षिक व्याजासह 16 लाख रुपये नुकसान भरपाई दिनेश सानी यांना द्यावी, असे आदेश दिवाणी न्यायाधीशांनी महानगरपालिकेला दिले आहेत. दिवाणी न्यायाधीश एस.एस.शिंदे यांनी हा निकाल दिला. यश दिनेश सोनी (वय 20) यांचा या अपघातात मृत्यू झाला होता. या बाबत त्यांचे वडील दिनेश फुलचंद सोनी (वय 52, रा.औरंगाबाद) यांनी पुणे महानगरपालिके विरोधात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करत एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली होती.

यश हे 26 जून 2006 रोजी त्यांच्या दुचाकीवरून संचेती हॉस्पिटल चौकाकडून कामगार पुतळा चौकाकडे जात होते. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात आले असता त्यांची दुचाकी एका मोठ्या खड्ड्यामुळे घसरली. या अपघातानंतर ते घसरत गेल्याने डिव्हायडरजवळ असलेला दोन फुटांचा अर्धवट कापलेला लोखंडी रॉड यश यांच्या छातीला लागला. त्यामुळे या अपघातात यश यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

शहरातील सार्वजनिक रस्त्यांची योग्य देखभाल करून रस्ते सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. महापालिका आपली जबाबदारी पार पाडण्यास अपयशी ठरल्याने अर्धवट कापलेल्या लोखंडी रॉडमुळेच यशचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, असा दावा दिनेश सोनी यांनी केला होता.

यश सोनी हा निष्काळजीपणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता दुचाकी चालवत होता. अतिवेगामुळे त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने त्याने लोखंडी सेपरेटरला धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला, असा दावा महापालिकेकडून करण्यात आला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत महानगरपालिकेने दिनेश सोनी यांच्या कुटुंबायांना 16 लाख 20 हजार रुपये नुकसान भरपाई आणि 15 हजार रुपये अंत्यविधीचा खर्च 16 टक्के व्याजासह (दावा दाखल केल्याच्या तारखेपासून) द्यावा, असा आदेश दिला.

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे :

– लोखंडी डिव्हायडर योग्य स्थितीत ठेवणे, त्याचा आकार योग्य ठेवणे आणि देखभाल करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
– संबंधित लोखंडी रॉड व लोखंडी सेपरेटर संबंधी महापालिकेने जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली नाही.
– महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला.
– डिव्हायडरचा लोखंडी रॉड छातीला लागल्याने यश यांचा मृत्यू झाला.

Back to top button