

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्हा कारागृहातील विविध रोजगाराभिमुख उपक्रम कारागृहातील बंदीवानांना त्यांच्या पुढील काळातील पुर्नवसनासाठी उपयुक्त ठरतील, असे प्रतिपादन नाशिक विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक यु. टी. पवार यांनी केले.
आज धुळे जिल्हा कारागृह वर्ग 1 येथे कारागृहातील बंदीवानासाठी तयार करण्यात आलेल्या विविध उपक्रमाचे उद्धाटन पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश संदीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, धुळे जिल्हा कारागृहाचे अधीक्षक विशाल बांदल, जिल्हा माहिला बाल विकास कार्यालयाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, उप वरिष्ठ तुरुंगाधिकारी सचिन जिजुंर्डे, तुरुगांधिकारी पोपट मानकर, सेंट अँथनी स्कुलचे प्राचार्य फादर विल्सन रॉड्रीक्स, फादर माल्कम आदी उपस्थित होते.
कारागृह उपमहानिरीक्षक पवार म्हणाले की, धुळे जिल्हा कारागृह हे ब्रिटशकालीन आहे. या कारागृहात आज येथे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहे. हे उपक्रम या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीच्या पुर्नवसनासाठी महत्वपूर्ण ठरणार आहेत. विशेषत: येथे बंदीवानांनी तयार केल्या वस्तु, सेवा या नागरिकांसाठी सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर बंदीच्या पुनर्वसनासाठी येथे विविध कोर्स येथे सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी सानेगुरुजी उपहारगृह, इस्त्रीकाम विभाग, धोबीकाम विभाग, दुचाकी वाशिंग सेंटर, अगरबत्ती विभाग, केशकर्तनालय विभाग, लोहारकाम विभाग, बेकरी विभाग, शिवणकाम विभाग असे विविध विभाग सुरु केले आहे. येथे शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांना या कामाचा शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर पुरक व्यवसाय करतांना निश्चित लाभ होईल. बंद्यामध्ये सुधारणा व पुर्नवसन व्हावे व कारागृहाचा विकास व्हावा याकरीता जिल्हा नियोजन समिती, धुळे यांचेमार्फत कारागृहातील कारखान्याचे साहित्य खरेदी करण्याकरीता निधी उपलब्ध करुन दिल्याने त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच पालकमंत्री गिरीष महाजन यांचे आभार मानले. तसेच बंद्याकरवी बाहेरच्या नागरिकांनाही सवलतीच्या दरात वस्तु तयार करुन दिल्या असून यांचा धुळेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, येथे उत्पादित होणा-या विविध वस्तु धुळेकरांना अंत्यत वाजवी दरात उपलबध होणार आहे. त्याचबरोबर शिक्षा भोगून येथून सुटल्यानंतर या कामाच्या अनुभवाचा बंदीजनांना उपयोग होणार असून त्यांना नवीन ऊर्जा व नवीन जीवन जगण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निधी जिल्हा कारागृहास उपलब्ध करुन देता आल्याचे त्यांनी सांगितले.
न्या.सदीप स्वामी म्हणाले की, धुळे जिल्हा कारागृहात कारागृह प्रशासनाने विविध उपक्रम राबवून बंदीवानांचे पुनर्वसनाचे केलेले काम कौतुकास्पद आहे. आर्थिक विवेचंनेतून अनेकांकडून गुन्हे घडत असतात. त्या बंदीवानांना शिक्षा भोगल्यानंतर त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, त्यांना समाजामध्ये पुन्हा मानाचे स्थान मिळावे, या उद्देशाने कारागृहामध्ये उद्योग व व्यवसाय सुरु करण्यात आले आहे. याचा त्यांना भविष्यात निश्चित उपयोग होईल. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, कार्यकारी अभियंता पाटील, परिविक्षा अधिकारी गिरीष जाधव, फादर विल्सन रॉड्रीक्स यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरुजी उपहारगृह, इस्त्रीकाम विभाग, धोबीकाम विभाग, दुचाकी बाशिंग सेंटर, अगरबत्ती विभाग, केशकर्तनालय विभाग, लोहारकाम विभाग, बेकरी विभाग, शिवणकाम विभाग युनिट, ओपन जिम, सानेगुरुजी गार्डनचे उद्धाटन संपन्न झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश देवपूरकर यांनी केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी व कारागृह विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :