Virat Kohli : टी-20 विश्वचषक संघाचे दार कोहलीसाठी बंद? BCCI देणार डच्चू? | पुढारी

Virat Kohli : टी-20 विश्वचषक संघाचे दार कोहलीसाठी बंद? BCCI देणार डच्चू?

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघांची घोषणा 30 एप्रिलपर्यंत केली जाईल. बीसीसीआयला एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात आपला संघ अंतिम करावा लागेल. दरम्यान, विराट कोहलीबाबत (Virat Kohli) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकातून त्याचे नाव काढून टाकले जाऊ शकते असे वृत्त समोर आले आहे.

वृत्तानुसार, भारतीय निवडकर्त्यांना टी-20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup) टीम इंडियामध्ये (Team India) विराट कोहलीचा (Virat Kohli) समावेश करण्यात रस नाही. याचे मुख्य कारण विराट कोहलीने टी-20 क्रिकेट फॉरमॅटमध्ये संघाच्या गरजा पूर्ण केल्या नसल्याचे मानले जात आहे. विराटने 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान रोहित शर्मासह त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. नंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्मा टी-20 विश्वचषकात भारताचा कर्णधार असल्याबद्दल बोलले, पण विराटच्या टी-20 भविष्याबद्दल त्यांनी कसलाही उल्लेख केला नाही.

या अहवालानुसार, बीसीसीआयने (BCCi) विराट कोहलीची (Virat Kohli) निवड मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यावर सोपवली आहे. कारण हा संवेदनशील मुद्दा पाहता बहुतेक लोकांना या प्रक्रियेपासून दूर राहायचे आहे. उल्लेखनीय आहे की, आगरकर यांनी विराटशी टी-20 मध्ये शैली बदलण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतही याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला फारसे यश मिळाले नाही.

‘हे’ देखील कारण आहे का?

रिपोर्टनुसार, टीम मॅनेजमेंटचा असा विश्वास आहे की वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्या अतिशय संथ आहेत. त्या मैदानांवर विराट कोहलीच्या खेळण्याचा संघाला फायदा होणार नाही. अशा परिस्थितीत आगरकर युवा खेळाडूंना पुढे येण्याची संधी देण्यासाठी विराट कोहलीशी बोलू शकतात. सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग, तिलक वर्मा आणि शिवम दुबे या युवा खेळाडूंमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये कोहलीपेक्षा जास्त योगदान देण्याची क्षमता आहे, असा विश्वास बीसीसीआयला आहे.

राहुल विकेटकीपर असेल?

2024 च्या टी-20 विश्वचषकात केएल राहुल भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक असेल हे जवळपास निश्चित दिसत आहे. मात्र, राहुलचा फिटनेसही चिंतेचा विषय असून त्याच्या फिटनेसचीही चाचणी आयपीएलदरम्यान होणार आहे. अशा परिस्थितीत भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चमकताना दिसणाऱ्या ध्रुव जुरेल आणि जितेश शर्मा यांच्यावर निवड समितीची सतत नजर असेल.

टी-20 विश्वचषक 2024 साठी सर्व संघांना त्यांच्या खेळाडूंची यादी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे पाठवायची आहे. भारतीय संघाला पाकिस्तान, यजमान अमेरिका आणि कॅनडासह अ गटात स्थान देण्यात आले आहे. भारताचा पहिला सामना कॅनडाविरुद्ध 5 जून रोजी खेळवला जाणार आहे. तर भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत 9 जून रोजी होणार आहे.

Back to top button