

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला ज्या सरकारने आरक्षण दिले तेच आता सत्तेत आहे, राज्य सरकारला आमचे प्रश्न कळले आहेत, सरकारला आम्ही आता दोन पर्याय देत आहोत यामध्ये आरक्षणप्रश्नी सरकार रिव्ह्यू पिटीशनमध्ये जाणार का व किती दिवसात निकाली काढणार ? तसेच जर आरक्षणाबाबत नव्याने प्रक्रीया पुर्ण करणार असाल तर ती किती दिवसात पुर्ण होणार हे पर्याय आम्ही सरकारसमोर ठेवले आहेत. सरकारने येत्या १५ दिवसाच्या आत मराठा आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट करावी, अन्यथा मराठा क्रांतीमोर्चा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा निर्णय मराठा क्रांतीमोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला.
मराठा क्रांतीमोर्चाची गुरुवारी (दि.१ सप्टेंबर) बैठक घेण्यात आली, या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विनोद पाटील यांनी या संदर्भात माहिती दिली.
यावेळी पाटील म्हणाले की, राज्य सरकारने, संपूर्ण राज्याने तसेच न्यायालयानेही मराठा समाजाचे आंदोलन पाहिले आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहोत. राज्य सरकारला खुर्च्या टिकवायच्या असतात आणि विरोधीपक्षाला खुर्चीत यायचे असते, त्यामुळे आता लोकसभेला १७ तर विधानसभा निवडणुकीसाठी २० महिने आहेत, त्यामध्ये आरक्षण तुम्ही कशा पद्धतीने देणार असा सवालही यावेळी सरकारला करण्यात आला.
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकारकडे निवेदन देण्यासाठी व मराठा क्रांती मोर्चाच्या महिला तसेच क्रांतीमोर्चातील विविध संघटनेचे पदाधिकारी, आरक्षणाचे अभ्यासक, प्रतिनिधी मुंबईला जाऊन चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्य सरकारने सुपरन्युमरीचा निर्णय घेतला असला तरी अनेक विभागांच्या अधिकाऱ्यांनी राज्य सरकारकडे याद्यासंदर्भातील माहिती पाठवली नाही, या याद्या तात्काळ याद्या सरकारकडे पाठवाव्या तसेच खासगी संस्थेमध्ये केजी टू पीजीपर्यंतचे निम्मे शुल्क सरकारने सारथी मार्फत भरावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
पत्रकार परिषदेपुर्वी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये आरक्षणासोबतच कोपर्डी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, सारथी याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये राजेंद्र जंजाळ, अभिजीत देशमुख, प्रा. चंद्रकांत भराट, डॉ. शिवानंद भानुसे, सुरेश वाकडे, सतीश वेताळ पाटील, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सुनील कोटकर, अप्पासाहेब कुढेकर, रमेश गायकवाड, रवींद्र काळे पाटील, सुवर्णा मोहिते, सुकन्या भोसले आदींची उपस्थिती होती.
कोपर्डी प्रकरणात वकील देणार
मराठा क्रांतीमोर्चाने आतापर्यंत चार सरकार पाहिलेले आहेत, सर्वच प्रमुख पक्ष सत्तेमध्ये आले आहेत. मात्र कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळालेला नाही, आता मराठा क्रांतीमोर्चा स्वत:ची लढाई स्वत: लढणार व कोपर्डी प्रकरण जलदगतीने चालवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा वकील देणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.