जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा | पुढारी

जळगाव : शैक्षणिक कर्जासाठी घेतलेल्या पैशांमध्ये निघाल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

कर्ज देण्याच्या निमित्ताने कल्याण येथील काँन्ट्रक्टरचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याची घटना भुसावळ शहरात घडली. आहे. यामध्ये कर्ज म्हणून १० लाखांच्या नोटांमध्ये लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा असल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण येथील रहिवासी असलेले मंगेश गुलाबराव वाडेकर यांना मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घ्यायचे होते. त्यांनी फेसबुकवर कर्जाबाबतची जाहिरात पाहिली होती. या जाहिरातीत कुठलेही कागदपत्र न घेता कर्ज मिळणार असल्याचे नमूद केले होते. त्यावरुन त्यांनी संबंधितांशी दोन महिन्यांपासून संपर्क साधत १० लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. बदल्यात १ लाख रुपये कमिशन लागेल, असे सांगण्यात आले. त्यानुसार संशयितांनी वाडेकर यांना भुसावळ शहरात बोलावले. ठरल्यानुसार वाडेकर हे मुलासह कर्जाची रक्कम घेण्यास भुसावळामध्ये आले. त्यांना रेल्वे स्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भेटीसाठी बोलविले. यावेळी संशयीत विकास म्हात्रे याने वाडेकर यांच्याकडे १० लाख असल्याचे सांगून बॅग सोपविली. त्यात पाचशे रुपयांच्या नोटांचे १ लाखांचे १० बंडल होते. मात्र यात पाचशे रुपयांच्या बंडलवरील पहिली नोट खरी होती इतर सर्व नोटा या चिल्ड्रन बँकेच्या होत्या. याप्रकरणी वाडेकर यांची ९ लाख ९५ हजारात फसवणूक झाल्याचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

बँकेत भरणा करताना फसवणूक उघड…
भुसावळ येथून नोटांची बॅग घेऊन वाडेकर हे सायंकाळी ५ च्या सुमारास पारोळ्याकडे रवाना झाले. सायंकाळी ७ वाजता पारोळा येथे पोहोचले. मात्र त्यांनी बँकेत नोटा भरणा करण्यासाठी दिल्या असता, त्या चिल्ड्रन बँकेच्या असल्याचे समोर आले. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पारोळा पोलिसांना पाचारण केले. वाडेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली असता, त्यांना भुसावळ बाजारपेठ पोलिसात पाठवल्यानंतर संशयीत विकास म्हात्रे व राजेश पाटील यांच्याविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, रेल्वे स्थानकाबाहेरील सीसीटीव्हीत चिल्ड्रन बँकेच्या नोटा देणारा संशयीत कैद झाला असून दुसर्‍या एकाचा शोध सुरू आहे.

हेही वाचा:

Back to top button