बिपीन रावत : पीएम मोदींच्या निवासस्थानी सुरक्षा कॅबिनेट समितीची बैठक | पुढारी

बिपीन रावत : पीएम मोदींच्या निवासस्थानी सुरक्षा कॅबिनेट समितीची बैठक

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशाच्या लष्करी सामर्थ्याला धक्का देणारी घटना आज (ता.०८) घडली असून पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होऊन १३ जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर लँडिंग होण्यास अवघ्या १० मिनिटांचा कालावधी उरला असतानाच तमिळनाडूमधील कन्नूरमध्ये ते कोसळले.

हेलिकॉप्टरमध्ये जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि पायलटही होते. हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जण होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह जळून ओळखण्यापलीकडे गेल्याने ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट केली जाणार आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, या भीषण आणि देशाला हादरवणाऱ्या अपघातानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. या अपघात संदर्भात चर्चा करण्यासाठी सुरक्षा कॅबिनेट समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. ही बैठक आज (ता. ०८) सायंकाळी साडे सहा वाजता होणार आहे.

तत्पूर्वी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी बिपीन रावत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुबीयांचा भेट घेतली. त्यानंतर लष्करप्रमुख मनोज मुकूंद नरवणे हे सुद्धा त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. हवाई दल प्रमुखांना घटनास्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरने तामिळनाडूमधील कोईम्बतूरजवळील सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण केले. ते उटीमधील वेलिंग्टन कॉलेजकडे जात असतानाच ते दुर्घटनाग्रस्त झाले.

उटीचे वैद्यकीय पथक आणि कोईम्बतूर येथील तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. राज्याचे वनमंत्रीही अपघातस्थळी पोहोचले आहेत. स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. निलगिरी डोंगरात हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले ते ठिकाण जंगली असल्याने अपघातस्थळापर्यंत पोहोचणे कठीण आहे.

हे ही वाचलं का ?

Mi-17V-5 हेलिकॉप्टर : रशियन निर्मित जगातील सर्वांत हायटेक चॉपर्सपैकी एक; त्याची रचनाच भव्यदिव्यता सांगते

Back to top button