Bipin Rawat update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बिपिन रावतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट | पुढारी

Bipin Rawat update : संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी बिपिन रावतांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टर्सला अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन जणांना वाचवण्यात यश आले असून अन्य सात जणांची अजूनही माहिती मिळालेली नाही. जनरल बिपिन रावत हे हेलिकॉप्टरमध्ये होते याला हवाई दलाने दुजोरा दिला आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांना वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर भाजले आहेत. हेलिकॉप्टरमधील उर्वरित लोकांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. विमानातील लोकांची आणि मृत सापडलेल्यांची ओळख सध्या उघड करण्यात आलेली नाही.

राजनाथ सिंह बिपीन रावतांच्या घरी पोहोचले

या अपघाताची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. सिंह संसदेतही या घटनेची माहिती देणार आहेत. दरम्यान, त्यांनी जनरल बिपीन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन कुटुबीयांच्या भेट घेतली. दरम्यान, सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार राजनाथ सिंह उद्या संसदेत माहिती देण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे हवाई दल प्रमुखांना अपघातस्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरने तामिळनाडूमधील कोईम्बतूरजवळील सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण केले. ते उटीमधील वेलिंग्टन कॉलेजमध्ये जात होते, जिथे संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आहे.

तामिळनाडू सरकारने बचाव कार्य आणि तपासात मदत करण्यासाठी निलगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पाठवले आहे. उटीचे वैद्यकीय पथक आणि कोईम्बतूर येथील तज्ज्ञ घटनास्थळी पाठवले जात आहेत.राज्याचे वनमंत्रीही अपघातस्थळी पोहोचले आहेत. स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत.

निलगिरी डोंगरात हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले ते ठिकाण जंगली असल्याने अपघातस्थळापर्यंत पोहोचणे कठीण आहे. व्हिज्युअल्समध्ये, डोंगरावर पसरलेला ढिगारा आणि दाट धूर आणि आग यांच्यामध्ये बचाव कार्यात गुंतलेली टीम दिसते.

जनरल रावत हे हेलिकॉप्टरमध्ये होते असे ट्विट करून भारतीय हवाई दलाने पुष्टी केली असून या घटनेचे कारण शोधण्यासाठी तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एलएस लिडर, एसएम, व्हीएसएम, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, विवेक कुमार, बी साई तेजा आणि हवालदान सतपाल हे हेलिकॉप्टरमध्ये होते. पाच क्रू मेंबर्सही विमानात होते.

63 वर्षीय जनरल रावत यांनी जानेवारी 2019 मध्ये भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. नव्याने निर्माण झालेल्या लष्करी व्यवहार विभागाच्या प्रमुखपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली.

हे ही वाचलं का ?

Back to top button