सीडीएस जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर; हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू | पुढारी

सीडीएस जनरल बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर; हेलिकॉप्टरमधील १४ पैकी १३ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर बिपीन रावत यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एएनआय वृत्तंसंस्थेने वृत्त दिले आहे. अपघाताची तीव्रता भीषण असल्याने मृतांची ओळख डीएनएच्या टेस्टच्या माध्यमातून केली जाणार आहे.

जनरल बिपीन रावत यांच्या Mi-17V5 हेलिकॉप्टर्सला अपघात झाला. दुसरीकडे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी नवी दिल्ली येथील बिपीन रावत यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.

हेलिकॉप्टर दुर्घटनेबाबत सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत निवेदन देतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हवाई दल प्रमुखांना अपघातस्थळी पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरने तामिळनाडूमधील कोईम्बतूरजवळील सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण केले. ते उटीमधील वेलिंग्टन कॉलेजमध्ये जात असतानाच ते दुर्घटनाग्रस्त झाले. तामिळनाडू सरकारने बचाव कार्य आणि तपासात मदत करण्यासाठी निलगिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पाठवले आहे.

उटीचे वैद्यकीय पथक आणि कोईम्बतूर येथील तज्ज्ञ घटनास्थळी पाठवले जात आहेत.राज्याचे वनमंत्रीही अपघातस्थळी पोहोचले आहेत. स्थानिक लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. निलगिरी डोंगरात हे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले ते ठिकाण जंगली असल्याने अपघातस्थळापर्यंत पोहोचणे कठीण आहे.

हे ही वाचलं का ?

Mi-17V5 या सर्वांत सुरक्षित हेलिकॉप्टरचा अपघात; बिपीन रावत यांच्यासह ‘हे’ ९ जण हेलिकॉप्टरमध्ये होते

हेलिकॉप्टर अपघात : संरक्षणमंत्र्यांनी दिली नरेंद्र मोदींना माहिती

Back to top button