नाशिक : सापुतारा रोडवर प्रतिबंधित अवैध गुटख्यासह पाच लाख हून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

नाशिक : सापुतारा रोडवर प्रतिबंधित अवैध गुटख्यासह पाच लाख हून अधिक रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक (वणी) – पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचनेनुसार आरोग्याच्या दृष्टीने गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखू तसेच मानवी आरोग्यास हानीकारक असणा-या खाद्यपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक, वाहतुक आदी व्यावसायांना प्रतिबंधित करण्यात आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीसांची जिल्हाअंतर्गत गुटख्याची वाहतूक, विक्री, वितरण व साठवणूक करणा-यांविरूध्द कारवाई करण्यात आली.

वणी पोलीस ठाणे हद्दीत वणी – सापुतारा रोडवर गुरुवार (दि.४) रोजी पिंपरी फाटा परिसरात काही संशयीत इसम एका पांढऱ्या रंगाच्या  स्विफ्ट डिझायर वाहनामध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याचे उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास मिळाली होती. त्यानुसार पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वणी पोलीस ठाणे हद्दीत पिंपरी फाटा परिसरात सापळा रचून, पाठलाग करून स्विफ्ट डिझायर वाहन (क्र. एम. एच. १५ – ई.बी. ०७३१) मध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे नवाज नुर शेख, (वय ५०, रा. वणी, ता.दिंडोरी), मकसुद महंमद सैय्यद, (वय ३७, रा. इंदिरानगर टेकडी, वणी, ता. दिंडोरी) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कब्जातून २,६१,८०० /- रूपये किंमतीचा अवैध प्रतिबंधित गुटखा, स्विफ्ट डिझायर कार, मोबाईल फोन असा एकुण ५,७३,८००/- रू. किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यातील नवाज नुर शेख इसम हा महाराष्ट्र राज्यात उत्पादन, साठा व साठयास प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधीत स्वादीष्ट तंबाखू, पानमसाला, सुगंधीत स्वादीष्ट सुपारी व तत्सम गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक असलेला अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्या विरूध्द वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ च्या पार्श्वभुमीवर जिल्हयाच्या सीमावर्ती भागांतून गुटखा व मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी तीव्र स्वरूपात कारवाई करण्यात येत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलीस उप निरीक्षक दत्ता कांभीरे, सहायक पोलीस उप निरीक्षक शिवाजी ठोंबरे, पोलीस हवालदार प्रविण सानप, संवत्सरकर, किशोर खराटे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे.

हेही वाचा:

Back to top button