Lok Sabha Election 2024 : हिंगोलीत शिवसेनेच्या दोन्ही गटांपुढे आव्हाने | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हिंगोलीत शिवसेनेच्या दोन्ही गटांपुढे आव्हाने

गजानन लोंढे

हिंगोली लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माजी आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांना उमेदवारी घोषित केली आहे तर दुसरीकडे महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांचे नाव जाहीर केले. परंतु, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जोरदार विरोध केल्याने अखेर बुधवारी सायंकाळी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करून हदगाव तालुक्यातील कोहळी येथील बाबुराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हिंगोलीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असली, तरी महायुतीचे नवखे उमेदवार बाबुराव कदम यांना पंधरा दिवसांत संपूर्ण मतदार संघात प्रचार यंत्रणा राबविण्यासाठी भाजपवर अवलंबून राहावे लागत आहे.

उमेदवार बदलल्याने भाजपची नाराजी दूर झाल्याचे बोलले जात असले, तरी अजूनही भाजपमधील इच्छुकांच्या मनात नेमके काय चालले आहे, हे समजणे अवघड बनल्याने महायुतीच्या उमेदवारांपुढील आव्हाने कायम आहेत. तर महाविकास आघाडीचे नागेश पाटील यांना स्वकीयांसह काँग्रेसच्या दिग्गजांचा होत असलेला विरोध पाहता दोघांनाही नाराजी दूर करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. शिंदे गटाचे बाबुराव कदम यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची असून, नागेश पाटील यांच्या रूपाने ठाकरेेंच्या शिवसेनेची अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यातच वंचितकडून डॉ. बी. डी. चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली असून, चव्हाण हे नेमकी कुणाची मते आपल्याकडे ओढतात, यावर शिंदे सेना व ठाकरे सेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांचा युतीचे उमेदवार हेमंत पाटील यांनी तब्बल पावणे तीन लाखांनी पराभव केला होता. परंतु, मध्यंतरी हेमंत पाटील यांचा मतदार संघातील संपर्क कमी झाल्याने त्यांच्याविरुद्ध नाराजी असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतील फुटीनंतर खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाले. भाजपने हिंगोली लोकसभा मतदार संघात लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून संघटन बांधणी केली होती. हिंगोली लोकसभेचे पक्षीय बलाबल पाहता हिंगोली, किनवट, उमरखेड विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. कळमनुरी विधानसभेत शिंदे गटाचे, तर वसमत विधानसभेत अजित पवार गटाचे आमदार असल्याने महायुतीचे पारडे जड असल्याचे वरकरणी दिसून येत आहे. महाविकास आघाडीत मात्र एकमेव हदगाव-हिमायतनगर काँग्रेसचे आमदार असल्याने महाविकास आघाडीचे नागेश पाटील-आष्टीकर यांना संघर्ष करावा लागणार आहे. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपने आक्रमक भूमिका घेत एक तर उमेदवार बदलावा किंवा भाजपला जागा सोडावी, असा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करत बाबुराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपची नाराजी दूर करण्यात शिंदे गट यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर यांनाही विरोधाचा सामना करावा लागत आहे. ठाकरे गटाचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा नाराज असल्याचे बोलले जात आहे, तर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव, लोकसभा प्रभारी अ‍ॅड. सचिन नाईक यांनीही आष्टीकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे.

आमदार प्रज्ञा सातव यांच्या समर्थकांनी तर थेट सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविले आहेत. शरद पवार गटाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनीही आपले पत्ते अजूनही उघड केले नसल्याने आष्टीकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. विशेष म्हणजे भूमिपुत्राला महायुती व महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली नाही. महाविकास आघाडीचे नागेश पाटील-आष्टीकर व महायुतीचे बाबुराव कदम-कोहळीकर हे दोघेही हदगाचे असल्याने पुन्हा एकदा उपर्‍या उमेदवारास निवडून कसे द्यावे, असा एक मतप्रवाहही समोर आला आहे. परिणामी, महायुतीसह महाविकास आघाडीच्या उमेदवाराची वाट बिकट असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. बी. डी.चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून मोहन राठोड यांना तब्बल 1 लाख 73 हजार मते पडली होती. वंचितने पुन्हा एकदा बंजारा समाजास उमेदवारी दिल्याने मतविभाजन होणार आहे. बंजारा समाजासह दलित मतदारांची संख्याही मोठी असल्याने डॉ. चव्हाण यांचा फटका महाविकास आघाडीसह महायुतीला बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

25 वर्षांत दोन वेळाच मिळाली भूमिपुत्रांना संधी

हिंगोली लोकसभा मतदार संघ नाव असले, तरी प्रत्यक्षात मागील 25 वर्षांतील पाच निवडणुकीत केवळ दोन वेळाच जिल्ह्यातील भूमिपुत्रांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित तीन वेळेस जिल्ह्याच्या बाहेरील उमेदवारच विजयी झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसल्याचे बोलले जात आहे. 1999-2004 अ‍ॅड. शिवाजी माने (शिवसेना), 2014-2019 अ‍ॅड. राजीव सातव (काँग्रेस) यांनी हिंगोली लोकसभेचे प्रतिनिधित्व केले. 2019 ला मात्र पुन्हा नांदेडचे हेमंत पाटील विजयी झाले. 2024 च्या लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून हदगावचे नागेश पाटील व महायुतीकडून हदगावचे बाबुराव कदम-कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर वंचितचे डॉ. बी. डी. चव्हाणसुद्धा नांदेडचे असल्याने तीनही उमेदवार जिल्ह्याबाहेरचे लादण्यात आल्याची भावना जिल्ह्यातील मतदारांमध्ये आहे. परिणामी, जिल्ह्यातील एखादा अपक्ष उमेदवार दिल्यास लढत चौरंगी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Back to top button