जळगाव- एकनाथ खडसे दिल्लीला गेल्यामुळे खडसे भाजपात घरवापसी करतील अशा चर्चेला जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात उधाण आले होते. मात्र, भाजप मध्ये जाण्याच्या चर्चेवर स्वत: खडसेंनी आता स्पष्टीकरण दिले आहे. तूर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही असे खडसेंनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसे भाजपात जाणार या विषयाला ते म्हणतात त्याप्रमाणे तुर्तास तरी पडदा पडला आहे. (Eknath Khadse)
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, माझ्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काही फार तथ्य नाही. यासंदर्भात काही निर्णय व्हायचं असेल तर तो लगेच होत नाही. त्यासाठी कार्यकर्ते सहकार्यांना विश्वासात घ्यावे लागते. हा महत्त्वाचा निर्णय आहे. ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत मदत केली आहे, जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेणे गरजेचे आहे. या संदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून मी दिलेली नाही. त्यामुळे तूर्तास तरी या प्रश्नांना कुठेतरी विराम द्यावा असं मला वाटतं. जेव्हा मला पक्षात प्रवेश करायचा असेल त्या त्यावेळी मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना माहिती देईल.
दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टातील कामासाठी गेलो होतो आणि मला कोर्टाने पुढची तारीख 25 एप्रिल दिली आहे. मी त्यासाठी गेलो होतो. पण मी दिल्लीत गेलो म्हणजे माझ्या अनेकांशी भेटीगाठी होतात. चर्चा होतात. हे नेहमीचच आहे. मात्र, काल हे होऊ शकलेलं नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.
हेही वाचा –