पुढारी विशेष | अबब…! राज्यातील कारागृहे हाउसफुल्ल | पुढारी

पुढारी विशेष | अबब...! राज्यातील कारागृहे हाउसफुल्ल

नाशिक : गौरव अहिरे

राज्यात विविध प्रकारच्या ६० कारागृहांमध्ये २६ हजार ३८७ बंदी (गुन्ह्यांमधील संशयित / आरोपी) ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, क्षमतेच्या १५३ टक्के बंदी कारागृहांमध्ये राहात आहेत. त्यानुसार राज्यातील कारागृहांमध्ये ४० हजार ४८५ इतके बंदी ३१ जानेवारी २०२४ अखेरपर्यंत होते. त्यात नाशिक मध्यवर्ती कारागृह वगळता इतर आठ मध्यवर्ती कारागृह क्षमतेपेक्षा अधिक बंदींनी भरलेले आहेत. तसेच २८ पैकी १७ जिल्हा कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक बंदी राहात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

विविध गुन्ह्यांमध्ये अटक केल्यानंतर संशयित आरोपींना कारागृहांमध्ये ठेवण्यात येते. त्यामुळे जामीन मिळेपर्यंत हे आरोपी कारागृहामध्येच राहात असतात. राज्यात मध्यवर्ती, जिल्हा, विशेष, महिला, किशोर सुधारालय, खुले अशा स्वरूपाची कारागृह असून, आटपाडी खुली वसाहत येथे एक कारागृह आहे. या कारागृहांमध्ये २६ हजार ३८७ बंदी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र त्यात क्षमतेपेक्षा ४० हजार ४८५ कैदी राहात असल्याचे उघड झाले आहेत. नाशिक मध्यवर्ती कारागृहात ३ हजार २०८ बंदी ठेवण्याची क्षमता असून, त्यात २ हजार ६०२ कैदी राहत आहेत. नाशिक वगळता इतर आठ मध्यवर्ती कारागृहांत क्षमतेपेक्षा जास्त कैदी राहात आहेत. त्यातही ठाणे मध्यवर्ती कारागृहात १ हजार १११ कैदी क्षमता असताना तेथे सर्वाधिक ४ हजार १८४ कैदी राहात असल्याचे भीषण वास्तव आहे.

राज्यातील ९ मध्यवर्ती कारागृहांमध्ये १६ हजार ११० बंदी क्षमता असून, त्यात तब्बल २७ हजार ८०० बंदी राहात आहेत, तर ३७ जिल्हा कारागृहांमध्ये ७ हजार १३६ बंदी क्षमता असून, त्यात तब्बल १० हजार २७९ बंदी आहेत. तसेच विशेष कारागृह, महिला कारागृह व किशोर सुधारालय कारागृहात ६१३ कैदी क्षमता असून, त्यात ५९४ कैदी राहात आहेत. तसेच खुल्या कारागृहांमध्ये २ हजार ५०० कैदी क्षमता असून, त्यात १ हजार ७९९ कैदी राहात आहेत.

न्यायाधीन बंदींची संख्या सर्वाधिक
राज्यातील ६० कारागृहांमध्ये कैद असलेल्या बंदींपैकी गुन्हा शाबित झालेल्यांची संख्या सात हजार ८५० इतकी आहेत. त्यात २४९ महिला आरोपींचाही समावेश आहे. तर ३२ हजार २१५ बंदी हे न्ययाधीन बंदी आहेत. त्यात १ हजार ३५२ महिला व २२ तृतीय पंथी संशयितांचा समावेश आहे. तर ४२० सराईत गुन्हेगारांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्यात ५ महिलांचाही समावेश आहे.

जिल्हा कारागृहेदेखील भरली
राज्यात २८ जिल्हा कारागृहे आहेत. त्यापैकी अकोला, धुळे, लातूर, जालना, नंदुरबार, उस्मानाबाद, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, भुसावळ या कारागृहांमध्येच क्षमतेपेक्षा कमी बंदी राहात आहेत. उर्वरित जिल्हा कारागृहांमध्ये क्षमतेहून अधिक बंदी राहात आहेत.

हेही वाचा:

Back to top button