Pune : ‘भीमाशंकर’कडून पहिली उचल 2 हजार 950 रुपये प्रतिटन | पुढारी

Pune : ‘भीमाशंकर’कडून पहिली उचल 2 हजार 950 रुपये प्रतिटन

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळ सभेमध्ये गाळप हंगाम 2023-24 साठी उसाला पहिली उचल 2 हजार 950 रुपये प्रतीमेट्रिक टनाप्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. बाळासाहेब बेंडे म्हणाले, कारखान्याने आत्तापर्यंत कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना नेहमीच चांगला दर दिलेला आहे. गाळप हंगाम 2023-24 करिता केंद्र शासनाने दि. 6 जुलै 2023 च्या परिपत्रकान्वये द्यावयाचा एफआरपी दर निश्चित केलेला आहे. त्याप्रमाणे कारखान्याचा सन 2022-23 गाळप हंगामातील सरासरी साखर उतार्‍यानुसार एफआरपी दर हा 2 हजार 853.57 रुपये प्रतीमेट्रिक टन येत आहे.

तथापि, सन 2023-24 हंगामात गाळप होणार्‍या उसासाठी पहिली उचल 2 हजार 950 रुपये प्रतीमेट्रिक टन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. पंधरावडा ऊस बिलाप्रमाणे उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कारखान्याचा सन 2023-24 चा गाळप हंगाम दि. 7 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झाला आहे. आजअखेर 1 लाख 55 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. हंगामात कारखाना कार्यक्षेत्र व परिसरात झालेल्या नोंदीनुसार 9 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यादृष्टीने ट्रक, ट्रॅक्टर टोळीसह, ट्रॅक्टर टायरगाडी, बैल टायरगाडी व हार्वेस्टरचे करार केलेले आहेत. त्याप्रमाणे यंत्रणा हजर झालेली आहे. कारखान्याने आधुनिकीकरण व विस्तारीकरणाची कामे केल्यामुळे गाळप क्षमतेत वाढ झालेली असल्याने ऊस उत्पादकांचे संपूर्ण उसाचे वेळेत गाळप होण्यास मदत होणार आहे. तरी कार्यक्षेत्र व परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी भीमाशंकर कारखान्यास जास्तीत जास्त ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

अंतिम ऊसदर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील हे कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करत असतात. त्यामुळे जास्तीचा ऊसदर मिळणे अपेक्षित आहे, असे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button