सावधान ! ज्येष्ठांमध्ये वाढताहेत श्वसन विकार; काय काळजी घ्याल ? | पुढारी

सावधान ! ज्येष्ठांमध्ये वाढताहेत श्वसन विकार; काय काळजी घ्याल ?

पिंपरी : ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या श्वसन विकाराचे खोकला, कोरडा खोकला, दम लागणे आदी आजार प्रामुख्याने आढळुन येत आहेत. त्यामध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत 20 ते 25 टक्के रुग्ण वाढले आहेत. एक ते दीड महिना औषधोपचार करुनही हे आजार बरे होत नसल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडले आहे. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये काही जणांना श्वास घेण्यास त्रास होतो. छातीत कफ साचतो. तसेच, याकडे त्यांनी वेळीच लक्ष न दिल्याने त्यांना न्यूमोनिया आजार होण्याचा धोकाही वाढला आहे.

हवेतील वाढते प्रदूषण, वातावरणातील बदल, वाढते वय आदी कारणांमुळे वृद्धांना श्वसन विकाराचा त्रास जाणवत आहे. त्याचप्रमाणे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, किडनीचे आजार आदीमुळे देखील वृद्धांना जडणारे श्वसन विकार लवकर बरे होत नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. ज्या वृद्धांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते, त्यांच्या श्वसन विकाराच्या तक्रारींचे निराकरण होण्यास विलंब लागत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

श्वसन विकारात काय काळजी घ्याल ?

  •  श्वसन विकार झालेल्या वृद्धांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • गर्दीच्या ठिकाणी जावे लागल्यास मास्क वापरावा.
  • पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.
  •  आहारात पातळ द्रवपदार्थांचा समावेश करावा.
  • वाफारा घेतल्याने या आजारांना प्रतिबंध करण्यास मदत होते.

वृद्धांमध्ये गेल्या महिन्याच्या तुलनेत 20 ते 25 टक्के श्वसन विकाराचे रुग्ण वाढले आहेत. एक ते दीड महिना उपचार करुनही हे आजार बरे होत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. ज्या वृद्धांच्या छातीत कफ साचतो त्यांचा तो कफ काढणे अडचणीचे ठरते. त्यांना न्युमोनियाचाही त्रास संभवतो.

– डॉ. अविनाश वाचासुंदर, कान-नाक-घसा तज्ज्ञ.

हेही वाचा

Back to top button