नागरिकांना पुढारी एक्स्पो व ऑटो शोची मोहिनी | पुढारी

नागरिकांना पुढारी एक्स्पो व ऑटो शोची मोहिनी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फार्म हाऊससाठी निसर्गरम्य ठिकाणची जागा, लक्झरी श्रेणीतील घरांपासून परवडणाऱ्या घरांचा असलेला पर्याय, इलेक्ट्रिक, हायब्रिड दुचाकी आणि मोटारकारच्या विविध श्रेणी एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अशाप्रकारचे एक्स्पो ‘पुढारी’ने सातत्याने राबवावेत असा प्रेमाचा आग्रहही केला.

राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे शनिवारी (दि.९) आणि रविवारी (दि.१०) पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो आणि ऑटो शो-२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. शहरातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक, जमीन विकसक, इलेक्ट्रिक दुचाकी निर्माते, मोटारकार विक्रेते यात सहभागी झाले होते. अवघ्या दोन दिवसीय एक्स्पोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. इलेक्ट्रिक गाड्यांची टेस्ट ड्राइव्ह घेणे आणि नव्या मोटारकारची माहिती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. घरे खरेदी करण्यासाठी शहरातील विविध भागांतून सहपरिवार नागरिकांनी एक्स्पोला हजेरी लावली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे हा सोहळा कौटुंबिक उत्सव झाला.

एसयूव्ही मोटारकारसह विविध श्रेणींतील मोटारींची माहिती घेऊन खरेदीचा विचार झाल्याचेही काही नागरिकांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांकडे नागरिक चौकशी करून प्रकल्प ठिकाणी भेट देण्यासही काही नागरिक गेले. दुचाकी आणि मोटारकार पाहण्यासाठी आलेले नागरिक घरांची आणि मालमत्तेचीही चौकशी करत होते. तर, काहींना घरासह व्यावसायिक दुकानांमध्येही गुंतवणूक करायची होती. सर्व माहिती एकाच छताखाली मिळाल्याने बहुविध पर्याय उपलब्ध झाल्याचे समाधान नागरिकांच्या बोलण्यातून दिसून आले.

सिंहगड रस्त्यावरील रहिवासी अपर्णा जगताप आपल्या मुलासह मोटारकार पाहण्यासाठी आल्या होत्या. त्या म्हणाल्या, मोटारकारचे विविध पर्याय पाहण्यासाठी इथे आलो होतो. पेट्रोलवरील एसयूव्ही मॉडेल आवडले आहे. स्पोर्ट लूकमुळे मला आणि माझ्या मुलालाही अशीच गाडी हवी आहे. या प्रदर्शनात मनासारखी गाडी पाहता आली. एसयूव्ही गाडीच्या खरेदीचा आम्ही विचार करत आहोत.

कात्रज येथील रहिवासी जयंत किनोलीकर आपल्या पत्नीसह घराची चौकशी करण्यासाठी आले होते. मुलीसाठी घर पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही भारती विद्यापीठ आणि कात्रज परिसरात दोन बीएचके घर पाहत होतो. इथे तशा सदनिकांची माहिती मिळाली. आता आम्ही प्रत्यक्ष प्रकल्पाच्या ठिकाणी भेट देऊन खरेदीचा निर्णय घेऊ. एकाच छताखाली विविध पर्याय पाहायला मिळत असल्याने असा एक्स्पो उपयुक्त असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

वारजे येथील रहिवासी श्रीमती विनिता या आपल्या मुलीसह घराच्या शोधात इथे आल्या होत्या. मुंबईत १८-१९ वर्षे काढल्यानंतर पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. आपलं स्वतःचे एक घरटं असावं, असे तीव्रतेने वाटत असल्याने आम्ही घराच्या शोधात आहोत. कामावरून आल्यावर ताजेतवाणे वाटेल असे वातावरण हवे. स्वच्छ सूर्यप्रकाश, फुले आणि झाडांची सोबत हवी. अगदी टेरेस गार्डन असेल तरी चालेल. मात्र, निसर्गाचे सानिध्य घराला हवे, अशा स्वरूपाच्या सदनिकेच्या आम्ही शोधात आहोत. कोविडनंतर नागरिकांना स्वतःचे एक छानसे घर असावे याची जाणीव झाली. घर भाड्याला देण्यात येणारी रक्कम घराच्या हप्त्यात वापरल्यास स्वतःचे घर होईल, असा विचार घेऊन नागरिक खरेदीसाठी बाहेरत पडत आहेत. आम्हीही तसाच विचार करून इथे आलो आहोत.

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रामा एरंडे ग्रुपचे प्रमोटर आय. एन. एरंडे यांनी ‘पुढारी एक्स्पो’ला भेट देत दिलखुलास गप्पा मारत आपली निरीक्षणे नोंदवली. एरंडे म्हणाले, कोविडनंतर शहरातील घर खरेदीचा कल वन-बीएचके सदनिकेवरून दीड बीएचके, दोन, अडीच बीएचके असा विस्तारला आहे. लोकांना प्रशस्त घर हवे आहे. धायरी, बावधन, वाकड आणि रावेत येथे आता शहर वेगाने विस्तारत आहे. शहरात अल्ट्रा लक्झरीपासून ते परवडणाऱ्या घरांचेही प्रकल्प आहेत. अल्ट्रा लक्झरी श्रेणीतील घरांचे मार्केट दहा ते पंधरा टक्के आहे. स्थानिक नागरिकांचे घर घेण्याचे प्रमाण साठ टक्के असून, कर्नाटक, गुजरात आणि राजस्थानी लोकांची गुंतवणूक ४० टक्के आहे.

पुढारी एक्स्पोसारखी प्रदर्शने खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे लोकांपर्यंत आपला प्रकल्प जातो. खरेदीची शक्यता अधिक वाढते. तसेच बांधकाम व्यावसायिकांनाही नवे प्रकल्प सादर करण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध होते, असेही एरंडे यांनी सांगितले.

शिवालय असोसिएट्सचे संचालक प्रकाश गायकवाड म्हणाले, धायरीतील निसर्गाच्या कुशीत बर्ड्स व्हॅली हा रहिवासी प्रकल्प साकारत आहे. छोट्या टेकड्या, झाडे-झुडपे यांचे सानिध्य असलेला हा परिसर पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरलेला असतो. आपल्या दिवसाची सुरुवात पक्ष्यांच्या सुरेल कंठध्वनीने होते. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश हे येथील वैशिष्ट्य आहे. प्रशस्त तीन मजली पार्किंग आणि लिफ्टची सुविधाही येते आहे. या शिवाय मुलांची खेळणी, विरंगुळा कट्टा, योगासाठी जागा, जॉगिंग ट्रॅक, ओपन जीम असे पाहताच क्षणी प्रेमात पडणारे वातावरण निर्माण केले आहे.

पुढारी वृत्तसमूह नेहमीच वाचकांना आणि ग्राहकांना अभिप्रेत असणारे उपक्रम आयोजित करीत असतो. नागरिकांना योग्य ठिकाणी घरे मिळावीत, सुविधा आणि सवलत मिळावी या हेतूने ‘पुढारी’ने प्रॉपर्टी प्रदर्शन आणि ऑटो शो एका छताखाली आणला आहे. पुढारी यापुढेही असेच लोकोपयोगी उपक्रम राबवेल, असा विश्वास आहे.

– मिलिंद पोकळे, संचालक, कॉसमॉस बँक.

मराठी माणसाला उद्योग आणि व्यवसायात चालना मिळावी यासाठी पुढारीने हा चांगला उपक्रम राबविला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून ऑटो आणि बांधकाम व्यवसायात स्थिरावत असलेल्या युवकांनाही इथे संधी देण्यात आली आहे. याशिवाय मोटार, दुचाकी या वाहनांचेही इथे प्रदर्शन लावण्यात आले आहे. दिव्यांग बांधवांसाठी तयार केलेल्या खास इलेक्ट्रिक दुचाकीही प्रदर्शनात पाहायला मिळाल्या, याचे समाधान वाटते.

– भीमराव तापकीर, आमदार.

प्रॉपर्टी आणि ऑटो प्रदर्शनाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून ही कल्पना अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातून आलेली मुलंही ऑटो आणि बांधकाम व्यवसायात धडपड करताना दिसत आहेत. अशा होतकरू व्यावसायिकांना व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल ‘पुढारी’ला शुभेच्छा !

– भगवान पासलकर, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज)

हेही वाचा

जालना : मनोज जरांगे पाटील यांची मंत्री संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर यांनी घेतली भेट

ऐन पावसाळ्यात विजयवाडी तलाव कोरडाठाक

Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे- पाटलांचा संघर्ष पडद्यावर चितारणार; चित्रपटाचे पोस्टर लाँच

Back to top button