

पाटस : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारा विजयवाडी तलाव ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडला आहे. यामुळे परिसरातील शेतीच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवत असल्याने शेतीपिके धोक्यात आली आहे. पाऊस आला नाही, तर या भागातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विजयवाडी तलाव हा फक्त निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने या परिसरात पाऊस पडणे गरजेचे असते; मात्र पावसाळ्याचे दिवस सुरू असताना अद्यापही पाऊस न पडल्यामुळे हा तलाव कोरडाठाक पडला आहे.
यामुळे या परिसरातील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे, तर काही कोरड्या पडल्या आहे. यामुळे शेतात उभी असणारी पिके संकटात सापडली आहेत. तलाव क्षेत्र कोरडे पडल्याने या तलाव क्षेत्रात उगवलेल्या गवताचा परिसरातील शेळ्या-मेंढ्या जनावरे चारा म्हणून उपयोग करीत आहे; मात्र हा चारादेखील येणार्या काही दिवसांत संपणार असल्याने मेंढपाळ यांना चार्याचा शोध घ्यावा लागणार आहे. यामुळे या भागात पाऊस पडणे गरजेचे बनले आहे.
वन्यजीवांचीदेखील भटकंती
विजयवाडी तलाव परिसरालगत मयूरेश्वर अभयारण्य क्षेत्र लागून असल्याने या वनक्षेत्रातील वन्यजीव अन्न-पाण्याच्या शोधत या तलाव परिसरात येत असतात; मात्र तलाव कोरडा पडल्याने या तलाव क्षेत्रात पक्षी व वन्यजीवांनी पाठ फिरवली असल्याने त्यांना अन्न-पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
हेही वाचा :