५ लाख ६० हजारांचा अपहार; हिंगोलीत ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

५ लाख ६० हजारांचा अपहार; हिंगोलीत ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील एनटीसी भागात असलेल्या निर्मल फूड प्रॉडक्ट्स या बेकरी मध्ये ५ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर शनिवारी दुपारी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शास्त्रीनगर भागातील व्यापारी श्याम नेणवाणी यांची एनटीसी भागामध्ये निर्मल फूड प्रॉडक्ट नावाची बेकरी आहे. या ठिकाणी अविनाश डोंगरदिवे चालक कोंडबा जाधव व सानप नावाची व्यक्ती काम करत होती.

या तिघांनी संगनमत करून बेकरी मधील ६७ हजार रुपयांचे गुलाबजामुन चे ११२ बॉक्स, ७० हजार रुपये किमतीचे बर्फीचे ५९ बॉक्स, एक लाख १२ हजार रुपये किमतीचे काजू टोस्ट चे ४५० बॉक्स, ८५ हजार रुपये किमतीचे सोनपापडीचे १७८ बॉक्स तसेच ९९ हजार रुपये किमतीचे सोनपापडीचे ५५ मोठे बॉक्स अशा एकूण पाच लाख साठ हजार रुपयांचा खाद्यपदार्थाचे बॉक्स तारीख १ सप्टेंबर २२ ते  ८ ऑगस्ट २३ या कालावधीत परस्पर विक्री केले.

दरम्यान, याबाबत शंका आल्याने बेकरी मधील साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी श्याम नेणवाणी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील तिघांवर पाच लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विकास पाटील उपनिरीक्षक पवार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button