

– मिथिला शौचे
वॉटरप्रूफ मस्कारा लावल्यानंतर तो काढणे बरेच कठीण असते. केवळ साध्या पाण्याने चेहरा धुवून तो निघत नाही. कारण पाण्यामुळे तो पसरणारा नसतो. म्हणून तो काढण्यासाठी आपल्याला वेगळे उपाय करावे लागतात. वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांच्या वापरामुळे मस्कारा चटकन, सुरक्षितपणे आणि परिणामकारकरीत्या निघतो. वॉटरप्रूफ मस्कारा भरपूर प्रमाणात लावला असेल तर तो योग्य प्रकारे काढणेसुद्धा अत्यावश्यक असते.
मस्कारा काढण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा आपण वापर करू शकतो. मस्कारा वॉटरप्रूफ असल्यामुळे पाण्याच्या विरुद्ध असणारा पदार्थ तो काढण्यासाठी वापरावा. तेल वापरल्यास या मस्कार्याचे गुणधर्म नष्ट होतात आणि त्यामुळे तो पापण्यांवरून सहजपणे निघू शकतो. ऑलिव्ह ऑईल हे असा मस्कारा काढण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ऑलिव्ह ऑईल आपण स्वयंपाकघराच्या वापरासाठीसुद्धा वापरू शकतो. त्यामुळे एकाच वेळी त्याचे दोन उपयोगही करता येतील.
खोबरेल तेल ः खोबर्याचे तेल हे अतिशय उत्तम असे सौंदर्य प्रसाधन असून केस, त्वचा, नख यांच्या आरोग्यासाठी ते खूप चांगले असते. याबरोबरच वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठीसुद्धा ते खूप चांगल्या प्रकारे उपोयगात येते.
एरंडेल तेल ः ऑलिव्ह ऑईलला एरंडेल तेल हे उत्तम पर्याय आहे.
बेबी ऑईल ः बेबी ऑईल हे स्वस्त आणि अतिशय चांगला पर्याय असून त्यामुळे सहजपणे वॉटरप्रूफ मस्कारा निघतो.
बेबी शाम्पू ः बेबी शाम्पू हा सुद्धा वॉटरप्रूफ मस्कारा काढण्यासाठी उपयोगी ठरते. डोळ्या भोवतालच्या अतिशय नाजूक त्वचेसाठी हा शाम्पू सुरक्षित असतो. कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचा कृत्रिम रंग आणि सुगंध नसतो. अगदी थोड्या प्रमाणात बेबी शाम्पू घ्यावा आणि तो पापण्यांवर लावावा. फक्त डोळ्यात जाऊ देऊ नये.
पेट्रोलियम जेली ः पेट्रोलियम जेली बोटावर घेऊन ती पापण्यांवर हलक्या हाताने चोळावी. तीस सेकंद तसेच ठेवावे आणि नंतर कापसाच्या बोळ्याने अलगद पुसून घ्यावे. नंतर पुन्हा स्वच्छ कापसाच्या बोळ्याने पापण्या पुसून घ्याव्यात. अर्थात पेट्रोलियम जेलीने वॉटरप्रूफ मस्कारा निघत असला तरीसुद्धा हा उपाय काही सर्वोत्तम नाही; पण दुसरा कुठलाच पर्याय नसेल तर कधीतरी तो वापरायला हरकत नाही.