गुडाळ : गव्याच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी | पुढारी

गुडाळ : गव्याच्या धडकेत शेतकरी गंभीर जखमी

गुडाळ, पुढारी वृत्तसेवा : गुडाळ गावाशेजारील शिवारात गुरे राखायला गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना राधानगरी तालुक्यातील तळगावपैकी बेरकळवाडी येथे मंगळवारी दुपारी घडली. बंडोपंत आनंदा हारुगले (वय-45) असे जखमी शेतकऱ्याचे नाव असून त्यांना सायंकाळी पाच वाजता सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, दुर्गमानवाड-तळगाव परिसरात बेरकळवाडी ही छोटीशी वाडी आहे. शेती आणि दूध व्यवसाय हे येथील लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. गावच्या पश्चिम बाजूला जंगल असल्याने या परिसरात नेहमीच  गव्यांचा  वावर असतो. बंडोपंत हे गावापासून एक किलोमीटर अंतरावरील बोंडगी नावाच्या शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते.

दुपारी बाराच्या सुमारास समोरून झुडपातून अचानक तीन गवे आले आणि त्यापैकी एका गव्याने बंडोपंत यांना धडक देऊन खाली पाडले. पुन्हा त्यांच्या पायात शिंग अडकून वर उचलून  दोन वेळा खाली आपटले. बंडोपंत  यांनी आरडाओरड करताच गवे पळून गेले.

जखमी अवस्थेत गावाच्या दिशेने तीनशे मीटर सरपटत गेल्यानंतर विमल बेरकळ या शेतात राखण करणाऱ्या महिलेने त्यांना पाहिले आणि धावत गावात जाऊन या दुर्घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी झोळी करून बंडोपंत यांना गावात आणले. वर्दी देताच वनविभागाचे पथक ही गावांत दाखल झाले. रुग्णवाहिकेतून वनरक्षक कु. जाधव यांनी जखमीस प्रथम कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

वनविभागाच्या पथकाने तातडीने बेरकळवाडी येथे भेट देऊन पंचनामा केला असून बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या बंडोपंत यांना वनविभागाने भरघोस अर्थसहाय्य करावे अशी मागणी दूध संस्थेचे चेअरमन सुरेश हारूगले यांनी केली आहे.

Back to top button