

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आरोग्य विज्ञान विद्या शाखेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 24) पासून दोनदिवसीय योगदर्शन-2023 या राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. भारतभरातून विविध योगतज्ज्ञ, योगशिक्षक, योगाभ्यासक, योगगुरू आदी सहभागी होणार असल्याची माहिती आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे संचालक तथा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. जयदीप निकम यांनी दिली.
उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील असतील. प्रमुख पाहुणे म्हणून योगविद्याधामचे संस्थापक योगाचार्य विश्वासराव मंडलिक, महर्षी विनोद रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक तथा योगगुरू संप्रसाद विनोद, डॉ. बी. के. पांडियामणी, तत्त्वज्ञान आणि योगाचे अभ्यासक डॉ. व्ही. एस. कांची, यूके मेटल इंडस्ट्रीचे प्रमुख राजेंद्र कातोरे आदी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचीही या चर्चासत्राला ऑनलाइन उपस्थिती लाभणार आहे. पहिल्या तीन सत्रांमध्ये प्रत्यक्ष निबंध सादरीकरण होणार असून, चौथ्या सत्रात ऑनलाइन सादरीकरण होणार आहे. दरम्यान, योगाचे महत्त्व अलीकडे जगभर मोठ्या प्रमाणावर पसरले असले तरी भविष्यातील महत्त्व ओळखून मुक्त विद्यापीठाने दूरदृष्टी ठेवून सन 2006 पासूनच योगशिक्षक हा पदविका शिक्षणक्रम सुरू केला. आजवर सुमारे 15 हजार विद्यार्थ्यांनी ही पदविका मिळविली आहे. योगक्षेत्रातील संधी व संशोधन यावर विचारमंथन होण्यासाठी योगदर्शन-2023 चे आयोजन केल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले.