पुणे : चौदा गावांना गारपिटीचा फटका ; आंबेगाव, जुन्नर, शिरूरमधील 346 हेक्टर क्षेत्र बाधित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेली आठ दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्याप्रमाणात शेतकर्यांचे नुकसान झाले. खेड कृषी उपविभागातील जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यात भाजीपाला, कांदा, चारापिके, उन्हाळी भुईमूग आणि बाजरीच्या पिकाचे यामुळे नुकसान झाले. या तीन तालुक्यांतील 14 गावांमधील 346 हेक्टर क्षेत्र गारपीटमुळे बाधित झाले.
जिल्ह्यात गेले काही दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीट सुरू आहे. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या गव्हाचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसला आहे.
जुन्नर तालुक्यात द्राक्ष बागायतदारांसह कांदा उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. यंदा कांद्याचे पीक रोगराई व लहरी हवामानामुळे धोक्यात आले आहे. खेड कृषी उपविभागातील आंबेगाव तालुक्यातील 5, जुन्नर तालुक्यातील 8 आणि शिरूर तालुक्यातील 1 अशा 14 गावांतील 346 हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे. यामुळे एक हजारापेक्षा अधिक शेतकर्यांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर)
आंबेगाव 730 252
जुन्नर 313 76
शिरूर 25 18
एकूण 1068 346
खेड कृषी उपविभागात 16 ते 18 मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पाऊस व गाटपिटीमुळे 14 गावांमधील 346 हेक्टर वरील क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतरदेखील काही भागांत पुन्हा पाऊस, गारपीट झाली. पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. मार्चअखेर एकत्रित अहवाल करून शासनाला व जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येईल.
मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी