नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ | पुढारी

नाशिक : इटलीच्या शिष्टमंडळाला भारतीय कांदाशेतीची भुरळ

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
इटलीच्या (फॉरेन डेलिगेशन) शिष्टमंडळाने नुकतीच येथील प्रमोद मनोहर आहेर यांच्या कांदा, टरबूज, मका शेतीला भेट दिली. या भागातील प्रयोगशील शेतकर्‍यांचे त्यांनी कौतुक केले.

गुणवत्तापूर्ण शेतीमाल उत्पादित करणार्‍या देशांकडे आयातदार देशांचे विशेष लक्ष असते. याच पार्श्वभूमीवर इटलीतील एका शिष्टमंडळाने नुकतीच देवळा तालुक्याला भेट दिली. प्रमोद आहेर यांच्या शेताला तसेच कि व्हिजन अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीची पाहणी केली. कांदा पिकाची उत्कृष्ट हाताळणी व साठवणूक व्यवस्थापन, कांदाचाळीचा दौरा केला. कांदा पिकांसह विविध फळबागा पाहून त्यांना उत्कृष्ट कामाची भुरळ पडली. भारतीय कांद्याची चव, आकार यात वेगळेपण असल्याने शिष्टमंडळाने थेट शेताच्या बांधावर जाऊन कांदालागवड व्यवस्थापन, लागवड पद्धत, सेंद्रिय निविष्ठांचा वापर हे कामकाज अनुभवले. तसेच मका व्यवस्थापन, खत व्यवस्था आणि सोयाबिन यांची उत्पादनवाढ तसेच नविन तंत्रज्ञान यांची देवाणघेवाण केली. शिष्टमंडळाने अस्सल मराठमोळ्या खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आनंद घेतला. आदरभाव पाहून शिष्टमंडळ भारावले. आहेर कुटुंबाचे विशेष आभार मानत निरोप घेतला. यावेळी राजीव पगार, जयेश शिंदे, दिनेश पगार, सम्राट वाघ, तुषार आहेर, शरद आहेर, तेजस आहेर, विनोद आहेर, उत्तम आहेर, पंकज सावकार, शरद खैरनार आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button