पाटस परिसरात गहू काढणीला वेग; हार्वेस्टरसाठी वेटिंग | पुढारी

पाटस परिसरात गहू काढणीला वेग; हार्वेस्टरसाठी वेटिंग

पाटस; पुढारी वृत्तसेवा : यंदा पोषक वातावरणामुळे दौंड तालुक्यात गव्हाचे पीक जोमात आले आहे. सध्या पाटस परिसरातील रोटी, हिंगणीगाडा, पांढरेवाडी, वासुंदे, कुसेगाव, पडवी, माळवाडी आदी गावांमध्ये गहू मळणीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, गव्हाची मळणी करणारे हार्वेस्टर मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना वेटिंगवर थांबावे लागत आहे. दुसरीकडे, अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यांच्या संकटाने शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.

पूर्वी पारंपरिक पद्धतीने गव्हाची मळणी केल्यास सुरुवातील गहू कापून त्याच्या पेंढ्या बांधल्या जात होत्या. नंतर गव्हाची मळणी केली जात होती. यामध्ये शेतकर्‍यांना जास्त मेहनत करावी लागत होती. तसेच, मजुरांची जुळवाजुळव करून त्यांची मजुरी द्यावी लागत होती. हे काम वेळखाऊ होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून परराज्यातून येणार्‍या हार्वेस्टरला मोठी मागणी वाढली आहे.

हार्वेस्टरमुळे मोठ्या क्षेत्रावरील गव्हाची मळणी अगदी कमी वेळेत होते. यामध्ये कष्ट, वेळ आणि खर्चाचीही मोठी बचत होते. हार्वेस्टर परवडत असल्याने शेतकर्‍यांकडून त्याला दरवर्षी मोठी मागणी असते. यंदा देखील दौंड तालुक्यातून हार्वेस्टरला शेतकरीवर्गातून मोठी मागणी वाढल्याचे चित्र आहे. शेतकर्‍यांना हे हार्वेस्टर मिळविण्यासाठी नंबर लावावे लागत आहेत. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत शेतात गहू मळणीची कामे सुरू आहेत.

यंदा पोषक वातावरणामुळे गव्हाचे पीक जोमात आले आहे. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणारा अवकाळी पाऊस, वादळी वार्‍यांमुळे काही ठिकाणी गव्हाचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी काही दिवस अवकाळीची शक्यता असल्याने गहू उत्पादक शेतकरी मळणीसाठी घाई करताना दिसत आहेत.

Back to top button