पैठण : चितेगावमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या गर्भपाताचा पर्दाफाश; डॉक्टर दाम्पत्य फरार | पुढारी

पैठण : चितेगावमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या गर्भपाताचा पर्दाफाश; डॉक्टर दाम्पत्य फरार

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील चितेगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये अवैधरित्या सुरु असणाऱ्या गर्भपाताचा पर्दाफाश करण्यात आला आहे. एका डॉक्टर दाम्पत्याच्या दवाखान्यामध्ये उपचार घेत असलेल्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. शनिवारी रात्री बिडकीन पोलीस व वैद्यकीय पथकाने अचानक छापा टाकून या दवाखान्यावर कारवाई केली.

दवाखाना चालविणारे डॉक्टर दाम्पत्य फरार झाले असून बिडकीन पोलीसांचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे. शनिवारी (दि.४) रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तामध्ये संबंधित दाम्पत्याच्या दवाखान्याची तपासणी सुरु आहे. बिडकीन येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पाठक, डॉ. भूषण आगाज यांच्याकडून हे पडताळणीचे काम सुरू होते. या घटनेमुळे चितेगाव येथे बीड जिल्ह्याची पुनरावृत्ती होती का काय अशी भीती वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केल्या जात आहे.

तालुक्यातील चितेगाव येथे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद रत्री रुग्णालय नावाने हा दवाखाना सुरू होता. या ठिकाणी विविध आजारासह गर्भपात केले जात होते. त्यामुळे परिसरातील अनेक स्त्रिया दररोज मोठ्या प्रमाणावर उपचार घेण्यासाठी या दवाखान्यामध्ये दररोज महिला येतात. परिसरातील एक विवाहित महिलेवर येथील डॉक्टरने गर्भपाताचे उपचार केले. त्यानंतर पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्याचा प्रकार घडल्यामुळे सदरील गर्भपात प्रकरण उघडकीस आले.

उपचार घेतलेल्या महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बिडकीन येथील शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जगदीश मोरे, पोना विष्णू गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने गर्भपात करण्यात येत असलेल्या दवाखान्यावर छापा टाकून रात्री उशिरापर्यंत गर्भपात दवाखान्याचे सत्यता पडताळणीचे काम पोलीस बंदोबस्त मध्ये सुरू होते. सदरील दवाखाना चालविणारे पती-पत्नी डॉक्टर फरार झाल्याचे आढळून आल्यामुळे या डॉक्टर दंपत्याचा शोध घेण्यासाठी बिडकीन पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून चितेगाव येथे बीड जिल्ह्याची पुनरतूती होते का काय ?अशी भीती वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त करण्यात येत आहे. या गर्भपात दवाखाना विषयी बिडकीन पोलीस रविवारी रोजी अधिकृत माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button