बारामती: पार्लरमध्ये ग्राहक बनून आली आणि दागिने चोरून गेली | पुढारी

बारामती: पार्लरमध्ये ग्राहक बनून आली आणि दागिने चोरून गेली

बारामती, पुढारी वृत्तसेवा: शहरातील एका ब्युटी पार्लरमध्ये ग्राहक म्हणून आलेल्या महिलेने दागिने चोरल्याची घटना घडली. पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले आहेत. पैशाची आवश्यकता असल्याने तिने लोभापोटी हे दागिने चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.

पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या संबंधी अधिक माहिती दिली. बारामती शहरातील एका महिलेच्या सदनिकेतून हे दागिने चोरीला गेले होते. त्यांच्या घराच्या दोन चाव्या आहेत. त्यातील एक कायम खुंटीला टांगलेली असते. २३ ते २८ जानेवारी दरम्यान त्या घरी नव्हत्या. या दरम्यान कपाटाची चावी घरातच होती. त्यात दागिने ठेवण्यात आले होते. २८ जानेवारी रोजी त्यांनी पाहणी केली असता दागिने आढळून आले नाहीत. त्यानंतर खुंटीला असलेली दुसरी चावी गायब असल्याचे दिसून आले. या घटनेत त्यांच्या घरातील १४ ग्रॅम सोन्याचे दागिने, ५.६ ग्रॅमची सोन्याची साखळी, २.६ ग्रॅम वजनाचे टाॅप्स, कपाटातील रोख ५ हजार गायब असल्याचे दिसून आले. यांनतर महिलेने तात्काळ शहर पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली.

फिर्यादीकडे ब्युटी पार्लरच्या निमित्ताने अनेक महिलांची ये-जा असते. त्यामुळे महिलांकडे कौशल्यपूर्ण तपास करणे अशक्य बाब होती. पोलिसांनी चौकशी केली असता शेजारील एका महिलेवर संशय निर्माण झाला. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता तिने चोरीची कबुली दिली. फिर्यादीचे घरात लक्ष नसताना तिने घरातील चावी गायब केली होती. ती वापरून ही चोरी केली. या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून चोरीचा सर्व माल जप्त करण्यात आला. हे दागिने तिने पुण्यात एका ठिकाणी गहाण ठेवले होते. पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले आहेत.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, प्रकाश वाघमारे, हवालदार कल्याण खांडेकर, दशरथ कोळेकर, हवालदार शिंदे, तुषार चव्हाण, दशरथ इंगवले, अक्षय सिताप, शाहू राणे, वंदना लोकरे यांनी केली.

Back to top button