Stampede In Tamilnadu : साडी वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ४ महिलांचा मृत्यू तर ११ गंभीर | पुढारी

Stampede In Tamilnadu : साडी वाटपाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी; ४ महिलांचा मृत्यू तर ११ गंभीर

चेन्नई; पुढारी ऑनलाईन : तामिळनाडूत साडीवाटपाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरी चार वृद्ध महिलांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज ( दि. ४ ) तामिळनाडूतील तिरुपत्तूर जिल्ह्यातील वन्नियंबडी या गावात घडली. या दुर्घटनेत ११ महिला गंभीर जखमी झाल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. (Stampede In Tamilnadu)

तिरुपत्तूर जिल्‍ह्यातील वन्नियंबडी गावात महिलांना मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम होता. थायपुसम सणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक उद्योजक आय्यपन यांनी केले होते. साडी वाटपाचे टोकण दिले जात होते. या वेळी एकच गर्दी उसळली. प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत चार वृद्ध महिलांचा मृत्यू झाला तर ११ महिला गंभीर जखमी झाल्‍या आहेत. (Stampede In Tamilnadu)

सुमारे ५०० महिला साड्या घेण्यासाठी जमल्या होत्या. दरम्यान, टोकन घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 15 महिला बेशुद्ध झाल्या त्यापैकी चार महिलांचा गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची घोषणा केली आहे.

जखमींना वन्नियंबडी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसपी बालकृष्ण यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत महिलांची ओळख पटली असून वल्लीम्मल, राजथी, नागम्मल, चिन्नम्मल अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, टोकन वितरणाची व्यवस्था करणाऱ्या अय्यपन या खासगी कंपनीच्या मालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.


हेही वाचा :

Back to top button