Mobile Addiction : अभ्यासाऐवजी मोबाइल गेमचे वेड नडले : हातात मोबाइल आहे, असे समजून दहा कि.मी. पायपीट | पुढारी

Mobile Addiction : अभ्यासाऐवजी मोबाइल गेमचे वेड नडले : हातात मोबाइल आहे, असे समजून दहा कि.मी. पायपीट

लातूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्या हातात मोबाइल आहे, असे समजून एक विद्यार्थी जवळपास दहा किलोमीटर पायी चालत गेला. महापूर येथे मांजरा नदीवरील पुलाजवळ हा विद्यार्थी झोपल्याचे रेणापूर येथील एका माजी नगरसेवकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्याला उठविल्यानंतर सदर विद्यार्थी मोबाइलच्या आहारी (Mobile Addiction) गेला होता, असे लक्षात आले.

लातूर येथे बीडच्या एका पालकांनी बहीण, भावाला शिकविण्यासाठी ठेवले होते. दोघेही बहीणभाऊ वेगवेगळ्या वसतिसगृहात राहतात. परंतु सोळा वर्षीय भावाला मोबाइल गेमचे व्यसन जडले होते. तो सगळा वेळ मोबाइलमध्येच घालत असे, असे त्याच्या मोठ्या बहिणीच्या लक्षात आले. अंघोळ, भोजनाचीही त्याला भ्रांत राहत नसल्याने दोन दिवसांपूर्वी बहिणीने त्याचा मोबाइल काढून घेतला. (Mobile Addiction)

या प्रकारानंतर विद्यार्थी हातात मोबाइल आहे, असे समजून वागू लागला. या तंद्रीत त्याने वसतिगृह सोडले आणि जवळपास दहा कि.मी. पायी चालत गेला. महापूर गावाजवळच्या मांजरा नदीच्या पुलावर हा अल्पवयीन विद्यार्थी थंडीत कुडकुडत असताना माजी नगरसेवक अनिल पवार यांना आढळला. त्यांनी चौकशी केल्यानंतर तो पळून आल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यास लातूर येथील शिवाजीनगर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यानच्या काळात त्याच्या बहिणीने भाऊ गायब झाल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. परंतु भाऊ सापडल्यानंतर तक्रार मागे घेण्यात आली.

याबाबत अनिल पवार यांना विचारले असता ते म्हणाले, की लातूर- रेणापूर असे आमचे सारखे येणे जाणे असते. गुरुवारी, शुक्रवारी असे सलग दोन दिवस मुलगा एकटा दिसल्यानंतर चौकशी केली, तेव्हा ” त्याने मला एकटे रहावयाचे आहे, असे सांगितले. आम्ही त्याला विश्वासात घेत त्याच्या पालकांना बोलावून घेतले. तसेच बहिणीने पोलिसांकडे तक्रार दिली होती म्हणून लातूर पोलिसांकडे त्यास सुपूर्द केले. या मुलाला मोबाइलचे व्यसन जडले होते, असे आमच्या लक्षात आले.

Back to top button