

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नातेवाइकांच्या उपचारासाठी परदेशातून आलेल्या एका महिलेचे दागिने गहाळ झाल्यानंतर काही तासांतच फरासखाना पोलिसांनी त्या महिलेचे 15 तोळे दागिने शोधून तिच्या हवाली केले. पोलिसांनी तत्काळ महिलेला केलेल्या मदतीमुळे तिला तिचे दागिने मिळाल्याने तिने पोलिसांचे आभार मानले आहेत. ऑस्ट्रेलियातील सादो ओमरले यांच्या सात वर्षांच्या मुलाला कसबा पेठेतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी (दि. 7 ) सायंकाळी त्यांची 15 तोळ्यांचे दागिने आणि कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झाली. महिलेने त्वरित शिवाजी रस्त्यावरील कसबा पेठ पोलिस चौकीत धाव घेतली आणि तक्रार दिली. उपनिरीक्षक कविता रूपनर यांच्याकडे ती महिला गेल्यानंतर तिची तक्रार ऐकून घेत त्यांनी तिला धीर देत ही बाब वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या कानावर घातली. पोलिसांनी कसबा पेठ परिसरात त्वरित तपास सुरू केला. रुग्णालयाच्या परिसरात पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, पोलिसांना दागिने असलेली पिशवी सापडली नाही.
अखेर पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेर्यांचे चित्रीकरण तपासले. त्यात सर्व प्रकार समोर आला. रुग्णालयातील खिडकीतून महिलेच्या लहान मुलानेच ती पिशवी रुग्णालयाच्या तळमजल्यावर टाकल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणात आढळून आले. पोलिस उपनिरीक्षक कविता रूपनर, उपनिरीक्षक राजू पवार, हवालदार सुनील मोरे, शिपाई अनिल गायकवाड, राजाराम गाढवे हे इमारतीच्या तळमजल्यावर गेले. अंधारात राडारोड्यात पिशवी पडली होती. तिचा शोध घेतला. यावेळी दागिनेदेखील राडारोड्यात पडले होते. मोबाइलच्या टॉर्चचा वापर करून दागिने शोधण्यात आले.
पोलिसांची धावपळ अन् सीसीटीव्हीची मदत
महिलेने दागिने असलेली पिशवी चोरीला गेल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली. सीसीटीव्ही चित्रीकरणात महिलेच्या मुलाने पिशवी रुग्णालयातील खिडकीतून टाकून दिल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयाच्या तळघराच्या परिसरातील राडारोड्यातून महिलेची पिशवी शोधून काढली.