दिंडोरी न्यायालयातील सरकारी वकील चंद्रभान नवले व अमोल गर्जे यांना एक लाख रुपये किमतीचे ब्रेसलेट रस्त्यात सापडले. त्यांनी हे सापडलेले ब्रेसलेट मूळमालकाला परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवला असून त्या दोघांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, पिंपराळे, चाळीसगाव येथील भाविक ऋषिकेश थोरात हे दिंडोरी येथे स्वामी समर्थ गुरुपीठ केंद्र येथे दर्शनासाठी आले होते. दरम्यान त्यांच्या हातातील दोन तोळे अडीच ग्रॅम वजनाचे ब्रेसलेट हरवले. मात्र लगेचच त्यांच्या ते लक्षात आले नाही. ते त्र्यंबकेश्वर येथील केंद्रावर दर्शनासाठी गेले असता, ब्रेसलेट पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ब्रेसलेटचा शोध घेतला मात्र ते काही सापडले नाही.
इकडे, दिंडोरी न्यायालयातील सरकारी वकील चंद्रभान नवले व अमोल गर्जे हे दर्शनासाठी गेले असता त्यांना रस्त्यावर ब्रेसलेट सापडले. त्यांनी लागलीच पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्याशी संपर्क साधला. याचवेळी भाविक ऋषिकेश थोरात हे दिंडोरीत आले व पोलिसांकडे ब्रेसलेट गहाळ झाल्याची माहिती देत असतानाच चंद्रभान नवले व अमोल गर्जे यांना ते सापडले असल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिली. ओळख पटवत पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, राजेंद्र देवरे यांच्या उपस्थितीत थोरात यांना ब्रेसलेट परत करण्यात आले. त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.