पिंपरी : स्मार्ट टॉयलेटच्या नावाखाली, ठेकेदाराचं चांगभलं | पुढारी

पिंपरी : स्मार्ट टॉयलेटच्या नावाखाली, ठेकेदाराचं चांगभलं

मिलिंद कांबळे : 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने शहरात पीपीपी (सार्वजनिक खासगी भागीदारी) तत्त्वावर स्मार्ट टॉयलेट बांधण्यात येत आहेत. विमानतळावर असणारी अत्याधुनिक सुविधा नागरिकांना 5 रुपयांमध्ये उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. मात्र, शहरातील मोक्याच्या 26 ठिकाणी टॉयलेटसोबत मोठे व्यापारी गाळेही उभारण्यात येणार आहेत. त्याचे भरमसाट भाडे व तेथील जाहिरातीतून ठेकेदाराला दरवर्षी कोट्यवधीचे उत्पन्न तब्बल 15 वर्षे मिळणार आहे. ‘स्मार्ट टॉयलेट’च्या नावाआड ठेकेदाराचे चांगभले करण्याचा हा ‘स्मार्ट प्रकार’ आहे. तीन वेळा मुदतवाढ देऊनही या कामासाठी एकच ठेकेदार आला आणि तो थेट पात्र ठरला.

ठेकेदार टॉयलेट बांधून त्यांची साफसफाई, देखभाल व दुरुस्ती करणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कोणताही खर्च देणार नाही. नागरिकांना 5 रुपयात शौचालयाची चांगली सुविधा मिळणार आहे, असा दावा स्मार्ट सिटीने केला आहे. टॉयलेटच्या शेजारी ठेकेदाराला दोन ते चार गाळे बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे. ते गाळ्यांचे भाडे तसेच, त्या परिसरातील जाहिराती फलकांचे उत्पन्न ठेकेदाराला मिळणार आहे. शहरात एका गाळ्याचे भाडे किमान 25 हजार इतके आहे. त्यानुसार, ठेकेदाराला वर्षाला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. टॉयलेट स्वच्छता व सुरक्षेवर त्याला किरकोळ खर्च करावा लागणार आहे. टॉयलेटच्या हा प्रकल्प नागरिकांपेक्षा ठेकेदारांच्या फायदाचा असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्यात शुल्क देऊन किती नागरिक त्यांचा लाभ घेणार, हाही मोठा प्रश्न आहे. निविदेत एकच ठेकेदार शहरात विविध ठिकाणी स्मार्ट टॉयलेट बांधण्यासाठी स्मार्ट सिटीने 9 डिसेंबर 2021 ला निविदा प्रसिद्ध केली होती. त्याला प्रतिसाद न मिळाल्याने 19 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने 27 जानेवारी 2022 ला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. त्यात एकमेव निविदा प्राप्त झाली. निविदेस दोन वेळा मुदतवाढ देऊनही एकाच ठेकेदाने प्रतिसाद दिला. तीनपेक्षा कमी ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने ती निविदा रद्द करून नव्याने प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना, स्मार्ट सिटीने त्या एकमेव ठेकेदाराला काम बहाल केले आहे. विनामूल्य 100 स्मार्ट टॉयलेटचा प्रस्तावाला केराची टोपली मुंबई येथील एका स्वयंसेवी संस्थेने पिंपरी-चिंचवड शहरात तब्बल 100 स्मार्ट टॉयलेट विनामूल्य बांधून देण्याची तयारी सन 2017 मध्ये दर्शविली होती.

पालिकेने केवळ जागा, पाणी, वीज व ड्रेनेज व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, इतकीच अट होती. वापर शुल्क व टॉयलेटवरील जाहिरातीच्या माध्यमातून ती संस्था उत्पन्न मिळविणार होती. संस्थेने प्रायोगिक तत्त्वावर निगडी बस थांबा येथे स्मार्ट टॉयलेटही बांधले होते. मात्र, ‘टक्केवारी’ मिळत नसल्याने त्या जनहितार्थ प्रस्तावाला पालिका प्रशासनाने केराची टोपली दाखविली. रेड झोनमध्ये स्मार्ट सिटीचे बेकायदा बांधकाम लष्कराने प्रतिबंधित केलेल्या रेडझोन भागातील निगडी येथे दोन स्मार्ट टॉयलेट बांधण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांनी पै पै जमा करून घर बांधल्यानंतर रेडझोनचे कारण देत पालिकेकडून ते पाडले जाते.

मात्र, पालिकेने स्वत:च बेकायदेशीरपणे रेड झोनमध्ये टॉयलेटचे बांधकाम केल्याची तक्रार समोर आली आहे. याच नियमाने अनेक वर्षांपासून पडून असलेले घरकुल इमारतींतील सदनिकांचे वितरण पालिकेने करावे, अशी मागणी होऊ लागली आहे. नागरिकांच्या सोईसाठी स्मार्ट टॉयलेटची सुविधा शहरातील नागरिकांच्या सोईसाठी स्मार्ट टॉयलेट बांधण्यात येत आहेत. निविदाप्रक्रिया नियमानुसार राबविण्यात आली आहे. सर्व 26 टॉयलेटचे काम जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट सिटीने केवळ जागा उपलब्ध करून दिली आहे.

टॉयलेटची दैनंदिन साफसफाई, पाणी व वीजपुरवठा, सुरक्षा, देखभाल व दुरुस्ती ठेकेदाराने करावयाची आहे. यामध्ये स्मार्ट सिटीचा कोणताही खर्च नाही. स्मार्ट सिटी टॉयलेटच्या साफसफाईवर देखरेख ठेवणार आहे. हा 15 वर्षांचा पीपीपी तत्त्वावरील करार आहे, असे स्मार्ट सिटीचे प्रकल्प महाव्यवस्थापक मनोज सेठिया यांनी सांगितले. या 26 ठिकाणी असणार स्मार्ट टॉयलेट शहरात विविध 26 ठिकाणच्या टॉयलेटमध्ये एकूण 108 सीट असणार आहेत.

त्यातील 7 ठिकाणी 4 सीट तर, उर्वरित 19 ठिकाणी 2 सीटची व्यवस्था आहे. चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाखाली रांका ज्वेलर्स व मारुती मंदिराजवळ, थेरगावचे डांगे चौक, धर्मराज चौक, आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ, चापेकर चौक, जगताप डेअरीजवळील साई चौक (2 ठिकाणी), काळेवाडी फाटा (2 ठिकाणी), काळेवाडीतील आदर्शनगर, जोतीबा उद्यान, नेहरूनगर न्यायालय, साने चौकातील कृष्णानगर भाजी मंडई, कुदळवाडी उड्डाण पुलाखाली, नाशिक फाटा उड्डाण पुलाखाली, केएसबी चौक, बर्ड व्हॅली, भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळील बीआरटी स्थानक, निगडी जलशुद्धीकरण केंद्राच्या समोर, अप्पूघर पार्किग, लिंक रस्ता उड्डाण पुलाखाली गावडेनगर, जाधववाडीतील क्रांती चौक, सांगवी फाटा येथे उड्डाण पुलाखाली, थेरगाव बोट क्लब, पिंपळे सौदागरमधील सेव्हन स्टार लेन येथे टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. निगडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे बसस्थानक व पिंपळे सौदागर येथील टॉयलेट नुकतेच नागरिकांसाठी खुले केले आहे. या प्रकल्पात टॉयलेटमध्ये आंघोळची सुविधा नाही.

Back to top button