हिंगोली, पुढारी वृत्तसेवा ः महसूल प्रशासनात मित्तभाषी व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असलेल्या उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी हे फावल्या वेळात पोहणे, सायकलिंग व रनिंगचाही छंद जोपासतात. त्यांनी रविवारी येथील येलदरी धरणात दोन तासांत तब्बल साडेआठ किलोमीटर पोहणे पुर्ण करीत आपली कसब दाखवून दिली.
दोन वर्षांपूर्वी सेनगाव येथे प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी रूजू झाले होते. त्यानंतर त्यांनी काही काळ सेलू येथे उपविभागीय अधिकारी म्हणून सेवा बजावल्यानंतर त्यांची हिंगोलीच्या उपविभागीय अधिकारी या पदावर काही महिन्यांपुर्वी बदली झाली. महसूलच्या कामात त्यांची वेगळी ओळख असून अत्यंत मित्तभाषी असलेल्या पारधी यांनी अल्पावधीतच महसूल विभागाच्या कामकाजाला चालला दिली असून, अनेक महत्वपुर्ण योजनांवर काम सुरू केले आहे. एकीकडे महसूलचा उत्तमरित्या कारभार सांभाळत त्यांच्या अंगी
असलेल्या छंदाचीही जोपासना केली आहे.
पारधी यांनी यापुर्वी पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक व औरंगाबाद येथील 21 किलोमीटरची धावण्याचा विक्रम केला. तसेच मागच्या महिन्यात पारधी यांनी औरंगाबाद ते जिंतूर, जिंतूर ते औरंगाबाद असे तीनशे किलोमीटरची सायकलिंग 13 तास 20 मिनिटांत पूर्ण केली. सायकलिंग व धावण्याच्या छंदाबरोबरच त्यांना पोहण्याचाही छंद असून रविवारी त्यांनी येलदरी धरणात आपले सहकारी प्रमोद भालेराव यांच्यासोबत दोन तासांत तब्बल साडेआठ किलोमीटरचे पोहणे पार पाडले. त्यांच्या या जिगरबाज छंदाचे नेहमीच कौतुक होत आले आहे. त्यांच्या छंदाबाबत विचारले असता, शालेय जीवनापासूनच सायकलिंग, रनिंग व पोहण्याचा छंद जोपासल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?