वसई-विरारमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी | पुढारी

वसई-विरारमधील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी

वसई/नालासोपारा : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी, त्याच बरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत बंड केलेल्या आमदारांचा निषेध करण्यासाठी वसईतील शिवसैनिकांच्या वतीने रविवार, 26 जून रोजी सकाळी 11.30 वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विरार मध्ये एकनाथ शिंदेचा यांचा पुतळा जाळण्यात आला. वसई, नालासोपारा आणि विरारमधील विविध भागांतून निघालेल्या रविवारच्या रॅलीत नालासोपारा येथील अग्निशमन केंद्र कार्यालयाजवळ एकत्रित आल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत गेलेले आमदार श्रीनिवास वनगा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

वसई शिवसेना तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ किरण चेंदवणकर, जिल्हा उपप्रमुख विवेक पाटील, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, शहरप्रमुख राजाराम बाबर आदी पदाधिकारी रॅली आणि त्यानंतरच्या सभेत यावेळी सहभागी झाले होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारमधील तब्बल 42 आमदार फुटल्यानंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यानिमित्ताने उद्धव ठाकरे यांच्यासमोर मुख्यमंत्री पदासोबतच शिवसेना हा पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचे एकीकडे समर्थन होत असताना; उद्धव ठाकरे यांनाही मोठ्या प्रमाणात भावनिक पाठिंबा मिळताना दिसत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वसईतील सामान्य शिवसैनिक मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे.
संकटात डगमगेल तो मावळा कसला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणारा सामान्य शिवसैनिक सर्वताकदीने नेहमीच शिवसेनेच्या सोबतीने उभा राहिला आहे. त्याची सोबत हीच शिवसेनेची ताकद आहे. आज पुन्हा या संकटानिमित्ताने ही ताकद आपल्याला दाखवायची आहे. तेव्हा आपण उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब यांच्यासाठी संघटित होऊन त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहुयात, असे प्रतिपादन तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी केले. या रॅलीत शाखाप्रमुख, विभागप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पदाधिकारी व सामान्य शिवसैनिक सहभागी झाले होते.

Back to top button