शंकर कवडे
पुणे : पावसामुळे सातारी आल्याची काढणी रखडल्याने बाजारातील आवक निम्म्यावर आली आहे. परिणामी, आल्याचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी वधारले आहे. पुण्यात चांगले दर मिळत असल्याने हिमाचल प्रदेश येथून बाजारात मटार विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यालाही मागणी चांगली असून त्याच्याही दरात वाढ झाली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी 90 ते 100 वाहनांमधून शेतमालाची आवक झाली. टोमॅटोचा हंगाम सुरू झाल्याने बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत आवकेत दुपटीने वाढ झाली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी पडल्याने भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागील दोन आठवड्यात बटाट्याची आवक घटली होती.
सध्या त्याच्या आवकेतही दुपटीने वाढ झाली आहे. त्यातुलनेत मागणी कमी राहिल्याने भावात घसरण झाल्याचे सांगण्यात आले. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने दर स्थिर राहिले. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे 10 टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून 150 गोणी मटार, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून 3 टेम्पो तोतापुरी कैरी व 2 टेम्पो घेवडा, इंदौर येथून 3 टेम्पो गाजर, तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची 14 ते 15 ट्रक इतकी आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे 500 ते 600 पोती, टोमॅटो 10 हजार ते 12 हजार क्रेटस, फ्लॉवर 10 ते 12 टेम्पो, कोबी 5 ते 6 टेम्पो, ढोबळी मिरची 10 ते 12 टेम्पो, गवार 5 ते 6 टेम्पो, भेंडी 6 ते 7 टेम्पो, भुईमूग 100 ते 125 गोणी, गाजर 5 ते 6 टेम्पो, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो.
पालेभाज्या महागच
बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव दहा ते पंचवीस रुपयांवर पोहोचलेले भाव कायम आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची 1 लाख 50 हजार जुडी व मेथीची 40 हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीरी व मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात मुळ्याच्या भावात जुडीमागे तब्बल सहा रुपये, पालकच्या भावात तीन रुपये, शेपू, करडई, अंबाडी आणि चवळईच्या भावात प्रत्येकी दोन रुपये तर मेथी, कांदापात, चाकवत आणि राजगिर्याच्या भावात प्रत्येकी एक रुपयांनी वाढ झाली आहे़ कोथिंबिरीची आवक वाढल्याने घाऊक बाजारात जुडीमागे दोन रुपयांनी घसरण झाली आहे रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव 5 ते 18 रुपये, तर किरकोळ बाजारात 15 ते 25 रुपये इतके राहिले.