

मुंबई: पुढारी वृत्तसेवा
दहावीचा निकाल जाहीर होण्याची वाट न पाहता आयटीआय प्रवेश नोंदणीला बुधवारी 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश जलद आणि सुरळीत होण्यासाठी संस्था तसेच प्राचार्य यांना प्रशिक्षण देऊन यावर्षी माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक आयटीआयवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी माहितीदर्शक फलक तसेच अन्य साधने वापरावीत अशा सूचना देण्यात आल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता आयटीआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशात वाढ होण्याच्या अनुषंगाने व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयाने स्कूल कनेक्ट उपक्रम राबविला. या उपक्रमातून दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयनंतर मिळणारी नोकरी तसेच स्किल, शिष्यवृत्ती योजना, प्रवेश प्रक्रिया, रोजगारांच्या उपलब्ध संधी आदींची माहिती देण्यात आली. सध्या इंडस्ट्रीला प्रशिक्षित कारागिरांची मोठी गरज भासत आहे. आयटीआय करणार्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उत्तम संधी आहेत. शिवाय आयटीआय झाल्यानंतर अभियांत्रिकीमध्ये उच्च शिक्षणाचा पर्यायही विद्यार्थ्यांसमोर खुला आहेच. यामुळे ग्रामीण तसेच शहरातील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, असे आवाहनही संचालनालयाच्या वतीने केले आहे.
गेल्या शैक्षणिक वर्षात आयटीआय प्रवेशात मोठी वाढ झाली. शासकीय आयटीआयमध्ये 93 हजार 763 आणि खासगी आयटीआयमध्ये 56 हजार 436 अशा एकूण 1 लाख 50 हजार 199 जागा गतवर्षी होत्या. शासकीय आयटीआयमधील जागांवर सुमारे 86 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी (92टक्के) प्रवेश घेतले तर खासगी आयटीआयमध्ये 31 हजार (56 टक्के) प्रवेश घेतले होते. यंदाही प्रवेशात मोठी वाढ करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही दळवी यांनी सांगितले.