हिमयुगातील मानवांची पदचिन्हे! | पुढारी

हिमयुगातील मानवांची पदचिन्हे!

वॉशिंग्टन ः हजारो वर्षांपूर्वी एक काळ असाही होता ज्यावेळी पृथ्वी अतिशय थंड होती. त्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावर बर्फाचे प्रमाण इतके होते की वैज्ञानिकांनी त्या कालखंडाला ‘हिमयुग’ असेच नाव दिले. या हिमयुगाच्या काळात भूमध्य रेषेच्या आसपासचा भाग वगळता अन्यत्र राहणे माणसासाठी सोपे नव्हते. मात्र, अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्यातील व्हाईट सँडस् नॅशनल पार्कमध्ये आढळलेले मानवी पायांचे ठसे आता वेगळीच कहाणी सांगत आहेत.

या ठशांवरून हिमयुगातील जीवन कसे होते हे दिसून येते. माणसाच्या उत्तर अमेरिकेतील आगमनाबाबतही हे ठसे नवे पुरावे देतात. न्यू मेक्सिकोच्या व्हाईट सँडस् नॅशनल पार्कमध्ये अनेक मैलांच्या परिसरात मनुष्य आणि प्राण्यांच्या पायांचे ठसे आढळतात. हे ठसे अमेरिकेतील मानवी जीवनाचे पुरावे देतात इतकेच नव्हे तर त्या काळात माणूस सध्या नामशेष झालेल्या हिमयुगीन प्राण्यांसमवेत राहत होता हे सुद्धा दाखवतात. या प्राण्यांमध्ये जमिनीवर राहणारा विशाल स्लॉथ आणि मॅमथ हत्तींचा समावेश आहे. पायांच्या या ठशांवरून दिसते की माणूस 23 हजार वर्षांपूर्वीपर्यंत उत्तर अमेरिकेत होता. हिमयुगाच्या काळात माणूस 16 हजार वर्षांपूर्वीच उत्तर अमेरिकेत पोहोचला होता. अशा वेळी हे नवे संशोधन जुन्या दाव्यांना खोडून काढते.

Back to top button