फसवणुकीसाठी अ‍ॅप डाऊनलोडिंगचा नवा फंडा | पुढारी

फसवणुकीसाठी अ‍ॅप डाऊनलोडिंगचा नवा फंडा

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  सायबर गुन्हेगार फसवणुकीच्या नवनवीन आयडिया शोधून काढत असतात. तुम्हाला लाखाच्या घरात पगार असलेला जॉब मिळाला असून त्याची फी अवघी दहा रुपये भरावी लागेल, अशी बतावणी हे सायबर चोरटे नागरिकांना करतात. मात्र, फीपे करण्यापूर्वी दोन अ‍ॅप डाऊनलोडकरावे लागतील असे सांगून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून फी पे करणार्‍या नागरिकांच्या फोनचा अ‍ॅक्सेस घेऊन त्याद्वारे संपूर्ण बँक खाते रिकामे केले जाते.

ठाण्यात अशा प्रकारे अ‍ॅप डाऊनलोड केल्यामुळे गेल्या चार महिन्यात 68 नागरिकांना तब्बल 93 लाख रुपये गमवावे लागले आहेत. त्यामुळे असे अप्रमाणित अ‍ॅप डाऊनलोड करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात राहणारे 37 वर्षीय तक्रारदार यांना 25 मे 2022 रोजी मोबाइलवर एका अनोळखीने फोन करून तुम्हाला जॉब मिळाला आहे, अशी
बतावणी केली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठवून अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी एक अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केले. त्यानंतर फोनवरून बोलणार्‍या व्यक्तीने केवायसी अपडेट करण्यासाठी दहा रुपये फी भरावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी ओटीपी क्रमांकाची मागणी फोन वरून बोलणार्‍या व्यक्तीने केली. हा ओटीपी क्रमांक दिल्यानंतर तक्रारदार यांच्या बँकेतून तब्बल 11 लाख 34 हजार रुपये ऑनलाईन लंपास करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी वर्तकनगर पोलिसात तक्रार तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी 3 जून रोजी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसर्‍या घटनेत ठाण्यातील लोकमान्य नगर येथे राहणार्‍या 33 वर्षीय महिलेस 4 एप्रिल 2022 रोजी दुपारी एका अज्ञात व्यक्तीने फोन कॉल करून तुमचे कुरिअर आले असून त्याची डिलिव्हरी करण्यासाठी पाच रुपये भरा, त्यानंतर तुम्हाला तुमचे कुरिअर मिळेल,असे सांगितले. त्यासाठी एक लिंक पाठविली जाईल, त्यावर पाच रुपये पाठवा, असेही तो म्हणाला. त्यांनी आलेल्या लिंकवर  पाच रुपये पाठवून एटीएमचा पिन क्रमांक समाविष्ट केला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 88 हजार रुपये लंपास झाले. या प्रकरणी महिलेने वर्तकनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली

कधी काळी संवादाचे माध्यम असलेला फोन आता स्मार्ट झाला. बँकेत पैसे भरण्यापासून ते शॉपिंग, बिल पेमेंटसह इतर व्यवहार आता स्मार्टफोनवर होत आहेत. त्यासाठी प्ले स्टोअर्समध्ये वेगवेगळे अ‍ॅप आहेत; मात्र यातील अनेक अ‍ॅप हे बनावट असून, ते डाऊनलोड केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कुठलेही अ‍ॅप डाउनलोड करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे, अन्यथा काही मिनिटांत आपले बँक खाते रिकामे होऊ शकते. यासाठी हॅकर्सची टोळी सक्रिय असून पोलिसांनी ग्राहकांना सतर्क केले आहे.

Back to top button