औरंगाबाद : पक्ष कार्यालयाकडे ढुकूंणही न पाहणाऱ्या नेत्यांचे वडेट्टीवारांनी टोचले कान | पुढारी

औरंगाबाद : पक्ष कार्यालयाकडे ढुकूंणही न पाहणाऱ्या नेत्यांचे वडेट्टीवारांनी टोचले कान

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : मी पक्षाचा आमदार, मंत्री म्हणून शहरात येत असेल, तर माझ्या पक्षाच्या कार्यालयात पहिले जाणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, आमच्यामुळे तुम्ही नाही. ही भावना असली पाहिजे. सत्ता ही कायम नसते. वतनदाऱ्या संपल्या. काय राहिलं?  जोपर्यंत आपण पक्षासाठी उभे राहत नाही, तोपर्यंत पक्ष वाढणार नाही, अशा शब्दांत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी शहरात येऊनही पक्ष कार्यालयात न फिरकणाऱ्या काँग्रेस मंत्री, नेत्यांचे कान टोचले.

गांधी भवनात काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने आज  (दि.२७) आयोजित मेळाव्यात ते (Vijay Vadettiwar) बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे, नागपूरमधील पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राजेंद्र राख, सत्संग मुंढे, माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस नामदेव पवार, माजी महापौर अशोक सायन्ना, सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, रविंद्र काळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमा पाटील, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष अतिश पितळे आदींची उपस्थिती होती.

वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले, ” बनवाबनवी करून भाजपने वोट बँक तयार केली आहे, या देशात ओबीसींची चळवळ पुढे नेण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे. ज्याच्या वाट्याचे त्याला मिळाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मुस्लिम समाजामध्येही ओबीसी आहेत. त्यांनाही सोबत घेऊन ही चळवळ पुढे नेवू. येत्या १४ तारखेला ओबीसींचा मेळावा घेण्यात येईल, त्यास किमान ५ लाख जण सहभागी होतील”.

राज्यमंत्र्यांचे नाव न घेता टोला

काही जण आहेत बुजगावणे, येतात, अन् जातात. काँग्रेसमध्ये होते तेव्हा आणि आता शिवसेनेत गेल्यावरही आपल्या बापाचा पक्ष असल्यासारखे वागतात, मात्र, हे जास्त दिवस चालत नाही, असा टोलाही त्यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव न घेता लगावला. काँग्रेस हा पक्ष नसून एक विचार आहे. या विचारांमुळेच देशात लोकशाही आहे. हे विचार संपल्यास देशातील लोकशाही संपेल. आमचा पक्ष वाढविताना आम्ही कुणाचीही गय करणार नाही. ते आमचे कामच आहे. सरकार आणि पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलं का ? 

Back to top button