मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष व शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्तियांच्या घर आणि मालमत्तेवर आयकर विभागाची सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरु आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्वपूर्ण कागदपत्रे, दस्तऐवज आणि काही रोख रक्कम ताब्यात घेतली आहे.
आयकर विभागाचे अधिकारी शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी दाखल झाले. पथकाने छापेमारी सुरु करत यशवंत जाधव यांची घरातच चौकशी केली. अधिकाऱ्यांनी जाधव यांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आणि कागदपत्रांची तपासणी करत काही महत्वपूर्ण ऐवज ताब्यात घेतला. त्यानंतर शनिवारीसुद्धा आयकर विभागाने छापेमारी सुरु ठेवली. यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 2 कोटींची रोख रक्कम जप्त केल्याची माहिती मिळते. जप्त दस्तऐवजाच्या आधारे आयकर विभागाचे अधिकारी पुढील तपास करत आहेत.