

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन : सध्या महाराष्ट्राचे राजकारण भोंग्याच्या प्रकरणावरुन चांगलेच ढवळून निघाले आहे. राज ठाकरे यांनी भोंग्यांवरुन ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. भोंगे हटविण्यावरुन राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच हाच धागा पकडत ते १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहेत. मुख्यमंत्री यांनी देखिल जाहीर सभा घेऊन विरोधकांना उत्तर देण्याचे जाहीर केल्यानंतर ते देखिल औरगाबाद येथे राज ठाकरे ज्या ठिकाणी सभा घेणार आहेत त्याच ठिकाणावरुन उद्धव ठाकरे देखील विरोधकांवर कडाडणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याचा इशारा दिला आहे. तसेच ३ मे पर्यंत हे भोंगे हटले नाहीत तर मशिदी समोर हनुमान चालिसा म्हणणारे भोंगे वाजवू असा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. राज्याच्या गृह मंत्रालायाने देखील राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला गांभिर्याने घेतलेले आहे.
भोंग्यावरुन आणि राणा दाम्पत्यांनी मुंबईत केलेल्या स्टंटबाजीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकर जाहीर सभा घेऊन विरोधकांना उत्तर देऊ असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १ मे रोजीच पुणे येथे जाहीर सभा घेणार आहेत. त्यानंतर लगेच आठवडाभरात राज ठाकरे हे ज्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर सभा घेणार आहेत. तेथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेऊन विरोधकांचा समाचार घेणार आहेत.
मराठवाडा सांस्कृतिक मैदान हे शिवसेनेसाठी खूपच महत्त्वाचे मानले जाते. या मैदानावरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा गाजलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाय हे मैदान कोणासाठी देखिल कधीही भरले नाही. बाळासाहेबांची ही किमया आता त्यांचेच वारसदार पुत्र उद्धव ठाकरे व पुतण्या राज ठाकरे हे करणार का हे पहावे लागेल.
या दोन सभांमुळे औरंगाबाद हे महारष्ट्रासाठीचे राजकीय आखाडा तरी बनत नाही ना याची देखिल चर्चा रंगली आहे. कारण याच औरंगाबाद येथील मैदानातून सध्याच्या राजकारणाची दिशा ठरवली जात आहे. त्यामुळे या दोन सभांच्या आयोजनामुळे सर्व महारष्ट्राचे लक्ष औरगाबादमधील या मराठवाडा सांस्कृतिक मैदानाकडे लागले आहे.