

चांदोबाचा लिंब येथे 'माऊली माऊली…' आणि हरिनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील 'उभे रिंगण' सोहळा आज (दि.२०) पार पडला. भाविक वारकऱ्यांनी 'याची देही याची डोळा' हा सोहळा (Ashadhi Wari 2023) अनुभवला.
अश्व धावे अश्वामागे। अवघा सोहळा पाहावा डोळे भरूनी । वैष्णव उभे रिंगणी। टाळ, मृदुंगा संगे। गेले रिंगण रंगुनी ॥ या रचनेचा प्रत्यय आणून देणाऱ्या या सोहळ्यात टाळ-मृदंगांचा गजर अन् विठ्ठलनामाचा जयघोष झाला. रिंगण सोहळा यावर्षीही वारकऱ्यांसाठी वारीचा आनंद द्विगुणीत करणारा ठरला.
तळपत्या उन्हाच्या झळ्या, फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ मृदंगाचा गजर, कोणी लेकरांना डोक्यावर घेऊन तर कोणी मिळेल, त्या जागी टाचा उंच करून, कोणी जवळ उभ्या असणाऱ्या वाहनांच्या टपावर, तर कोणी झाडावर चढून उभे रिंगण पाहण्यासाठी अतुराले होते. दुपारच्या भर उन्हात तान्ह्या बाळापासून ते नव्वदी पार असलेले माऊली रिंगण सोहळ्याचा आनंद आपल्या डोळ्यात टिपण्यात अतुर झाले होते. रंगरंगोटी केलेले, फुलांची सजावट केलेले चांदोबाचा लिंब मंदिर सर्वांना आकर्षित करत होते.
अखेर माऊलींची पालखी तरडगाव पासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चांदोबाचा लिंब याठिकाणी पोहोचली. चोपदारांनी उभे रिंगण सोहळ्याच्या जागेची पाहणी केली. सोहळ्यातील सर्व दिंड्यातील वारकरी रस्त्याच्या मध्ये एकमेकांसमोर दोन रांगांमध्ये उभे राहत माऊली… माऊली… ग्यानबा तुकारामचा जयघोष सुरू करत रिंगणाची महती दाखवून दिली.
माऊलीच्या पालखीसोबत दोन अश्व एकावर स्वतः माऊली तर दुसरा अश्व शितोळे सरकारांचा ज्यावर चोपदार हातात भगवी पताका घेऊन बसलेले. सर्वांच्या नजरा चोपदार दंड उंचावून इशारा देण्य़ाकडे लागल्या होत्या. अखेर चोपदारांनी दंड उंचावून रिंगण सुरू झाल्याचा इशारा दिला. दोन्ही अश्व तुफान वेगाने रथापासून पुढे उभ्या असलेल्या वारकऱ्यांच्या दुतर्फा असलेल्या मानवी साखळीतील शेवटच्या दिंडीपर्यंत पोहोचले आणि पुन्हा त्याच वेगाने परत माऊलींच्या चांदीच्या रथापर्यंत पोहचले.
अश्वांच्या टापांचा आवाज टाळ मृदंगाच्या आवाजात आपलेही अस्तित्व तेवढ्याच दिमाखात सिद्ध करत होता. शेवटी एकाच गर्दी उसळली ती अश्वांच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावण्यासाठी. माऊलींचे अश्व ज्या मार्गावरून धावत गेले त्या जागेवर फुगड्या, उंच उड्या मारून अखंड वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याचा आनंद साजरा केला. रथापुढे आल्यानंतर दोन्ही अश्वांना पेढ्यांचा प्रसाद भरवला आणि चोपदारांनी चांदीचा राजदंड उंचावत रिंगण सोहळा पार पाडल्याचे संकेत दिले. त्यानंतर लाखो वैष्णव तरडगावच्या दिशेने मुक्कामासाठी मार्गस्थ झाले.
हेही वाचा