

राजेंद्र गलांडे
बारामती : 'तुकाराम… तुकाराम' असा जयघोष करीत बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मेंढ्यांचे रिंगण सोमवारी (दि. 19) पार पडले. या सोहळ्यानंतर पालखीने इंदापूर तालुक्यात प्रवेश केला. बारामतीकरांकडून या वेळी सोहळ्याला निरोप देण्यात आला. बारामतीतील मुक्काम आटोपून सोहळा सोमवारी सकाळी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.
पिंपळी-लिमेटकमध्ये थांबत पुढे तो काटेवाडीत पोहचला. वेशीपासून ग्रामस्थांनी खांद्यावरून पालखी दर्शनमंडपात नेली. 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'चा जयघोष या वेळी झाला. परीट बांधवांकडून पांढर्याशुभ्र धोतराच्या पायघड्या अंथरल्या गेल्या. त्यानंतर ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. वारकर्यांनी ग्रामस्थांचा पाहुणचार घेतला.
काटेवाडीतील वैशिष्ट्यपूर्ण रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. काटेवाडीत सोहळ्याभोवती मेंढपाळ बांधवांनी मेंढ्यांचे रिंगण करीत हरिनामाचा गजर केला. मेंढ्यांची रोगराई दूर व्हावी, अरिष्ट येऊ नये, यासाठी ही परंपरा वर्षानुवर्षे जपली जाते. संभाजी काळे, तात्यासो मासाळ, महादेव काळे, सुभाष मासाळ, हरी महानवर यांच्या मेंढ्यांनी पालखी रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालत रिंगण पूर्ण केले. या वेळी 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल'च्या गजराने परिसर दुमदुमन गेला. पालखीभोवती वारकर्यांनी रिंगण केले अन् सुरू झाला डोळ्यांचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा.
हेही वाचा