Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याचा आनंद ; पण पावसाच्या ओढीने काळजी | पुढारी

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याचा आनंद ; पण पावसाच्या ओढीने काळजी

बारामती (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा :  संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे बारामतीत मी स्वागत करतो. सोहळ्याचा आनंद असताना दुसरीकडे पाऊस नसल्याने चिंता आहे. संत तुकोबाराय, ज्ञानेश्वर माउली व विठूरायाचरणी मी पावसासाठी साकडे घालत असल्याचे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. बारामतीत ते बोलत होते. शनिवारी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती तालुक्यात आला. उंडवडी येथे पहिला मुक्काम पार पडला. सोहळ्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. पण पावसाने ओढ दिल्याने शेतकरी काळजीत आहे. गुंजवणी, निरा देवघर, भाटघर, वीर या धरण क्षेत्रात अद्याप पाऊस नाही.

निरा उजवा कालवा बंद केला आहे. निरा डावा कालवा अद्याप सुरू आहे. परंतु या कालव्याचा पाण्याचा हिस्सा संपत आला आहे. 15 जूनपर्यंत निरा डावा कालवा सुरू राहावा, असे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते. लोकप्रतिनिधींना त्याला सहकार्य केले. परंतु अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. कोकणातही म्हणावा तसा पाऊस सक्रिय नाही. हवामान खाते सतत सांगतेय की आता सुरू होईल… पण होत नसल्याने काळजी वाढल्याचेही पवार म्हणाले.

शेतक-यांनी आता पेरण्या करू नयेत, असे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्या केल्या आणि पाऊस झाला नाही तर बियाणे वाया जाईल. दुबार पेरणीची वेळ येईल. पालखी सोहळ्याचा आनंद, समाधान आहे, परंतु दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने ती काळजी सगळ्यांच्या चेह-यावर दिसतेय. पाऊस झालाच नाही तर दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल. टँकर सुरू करावे लागतील. विहिरी अधिग्रहित कराव्या लागतील. शेवटी अशी संकटे येत असतात. त्यांना घाबरायचे नसते. तर संकटांचा मुकाबला करायचा असतो. मागे अशी वेळ आल्यावर चारा छावण्या सुरू केल्या. वरच्या धरणाचे पाणी उजनीत सोडून पाणी योजना सुरू ठेवल्या. रविवारी मी पालखीचे दर्शन घेणार आहे. तुकोबाराय, माउली व पंढरीच्या विठूरायाचरणी काहीही करून आता पाऊस पडू दे, आमच्यावर आलेले संकट टळू दे, असे साकडे घालणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : 

पुणे : आळेफाटा पोलिस ठाण्यात वकिलाचा दारू पिऊन धिंगाणा

पुणे : गूळ, खाद्यतेलांची दरवाढ; साखर, गोटा खोबरे दरात घट

Back to top button