Ashadhi Wari 2023 : संत सोपानकाका पालखी कोर्‍हाळे मुक्कामी विसावली | पुढारी

Ashadhi Wari 2023 : संत सोपानकाका पालखी कोर्‍हाळे मुक्कामी विसावली

वडगाव निंबाळकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत श्रीसोपानकाका महाराज पालखी सोहळा सोमवारी (दि. 19) कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथे मुक्कामी विसावला. गावच्या वेशीवर पेशवेवस्ती येथे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या दिंडीने तेथून सोहळा गावामध्ये आणला. टाळ-मृदंगांच्या गजरात, पारंपरिक ताशांच्या निनादात फुलांची उधळण करीत सरपंच रवींद्र खोमणे, पोलिस पाटील शरद खोमणे, नंदकुमार मोरे यांच्यासह श्री सिद्धेश्वर भजनी मंडळ, सप्ताह मंडळे यांच्याकडून पालखीचे स्वागत झाले.

श्री सिद्धेश्वर मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी सोहळा विसावला. सोहळाप्रमुख ह.भ.प. त्रिगुण महाराज गोसावी यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षी सोहळ्यात समाज मोठ्या प्रमाणात सामील झाल्याचे मुख्य चोपदार रणवरे महाराज यांनी सांगितले. कोर्‍हाळे ग्रामस्थांतर्फे वारकर्‍यांसाठी भोजनाची, निवासाची तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती.

तत्पूर्वी, रविवारचा (दि. 18) सोमेश्वर येथील मुक्काम आटोपून सोमवारी (दि. 19) सकाळी पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. सोरटेवाडी येथे विसावा घेत 11 वाजण्याच्या सुमारास होळ आठ फाटा येथे सोहळा दाखल झाला. उपसरपंच रमेश वायाळ, बाबासो होळकर, हनुमंत भंडलकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि कदमवस्ती भजनी मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुपारची विश्रांती दहाफाटा येथील आनंद विद्यालय येथे झाली. प्रमोदकुमार गिते यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला.

शांताराम होळकर यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. या वेळी सदोबाचीवाडीच्या सरपंच मनीषा होळकर, सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गिते, निरा बाजार समितीचे संचालक पंकज निलाखे, माजी सरपंच विलास होळकर, दीपक होळकर, जगन्नाथ होळकर, जमीर शेख, सस्तेवाडी सरपंच बापूराव ठोंबरे उपस्थित होते. टाळ-मृदंगांच्या गजराने महाविद्यालयीन परिसर दुमदुमन गेला. अडीच तासांच्या विश्रांतीनंतर पालखीने वडगाव निंबाळकरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

येथील पोलिस ठाण्याजवळ सरपंच सुनील ढोले, उपसरपंच संगीता शहा, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर, शिवाजी राजेनिंबाळकर, शोभा जगताप, रोहिदास हिरवे, मधुकर शिंदे, मारुती पानसरे, शिवाजी नेवसे, दत्तात्रय गिरमे, प्रमोद किर्वे, अजित भोसले, संजय साळवे, बापूराव दरेकर, अशोक माने, वडगाव निंबाळकर भजन मंडळ उपस्थित होते.

सायंकाळी साडेचारच्या दरम्यान पालखी येथील सावतामाळी मंदिरात आली. या वेळी हरिनामाचा गजर करून पालखीचे स्वागत करण्यात आले. सावतामाळी देवस्थान ट्रस्टच्या वतीने दिंडीप्रमुखांचे स्वागत करण्यात आले. विविध सार्वजनिक मंडळ आणि संस्थांच्या वतीने फराळ, खाद्यपदार्थ मोफत वितरण करण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे व सहकार्‍यांनी बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

महिन्यात चारवेळा रोहित्र जळाले; कळसला पिकांचे नुकसान

नाशिक : कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात, दुचाकीवरील दोघे ठार

वालचंदनगर : डाळिंब बागांना क्रॉप कव्हरने नवसंजीवनी

Back to top button